वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
पारनेर / प्रतिनिधी
जवळा परिसरात शुक्रवारी (दि.22) रोजी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. केळी, पपई, डाळिंब तसेच आंब्याच्या बागा भुईसपाट झाल्या. शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या नुकसानी झाल्या असून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गेली दोन ते तीन दिवसांपासून पाऊसाचे वातावरण होते. दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बघता बघता फळबागा उद्ध्वस्त झाल्या. जवळा परिसर हा कुकडी डावा कालवा अंतर्गत येत असून बागायत क्षेत्र म्हणून हा परिसर आर्थिक समृद्धी मिळवून देणारा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागा असून यामध्ये केळी, डाळिंब, पपई, आंबा या फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत. शेकडो हेक्टर फळबागेचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी कैऱ्यांचे ढिगच ढीग पाहावयास मिळाले.
सर्व बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच जवळा व परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एसटी बस स्थानक परिसरातील घरांचे पत्रे उडून गेले. बांधकामाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोलर पंपावरील साहित्य उडून गेल्याने सोलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या नुकसानग्रस्त झालेल्या भागांची तातडीने पाहणी करून भरपाई देण्याची मागणी जनतेतून होत आहे.










