- जाहिरात -spot_img
breaking news

वर्‍हाडींवर दु:खाचा डोंगर; लझरी, कंटेनर, एसटी बस व कारची धडक, ३५ जखमी

नगर-पुणे महामार्गावर चार वाहनांचा भीषण साखळी अपघात, ३० ते ३५ जण जखमी
सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावरील पळवे खुर्द शिवारात गुरुवारी चार वाहनांचा भीषण अपघात झाला. मठ वस्तीवरील घाणेगाव रोडलगत असलेल्या हॉटेल जय मल्हारसमोर लझरी बस, कंटेनर, एसटी बस आणि स्विफ्ट डिझायर कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आळंदी येथे विवाहासाठी निघालेल्या वर्‍हाडी मंडळींसह सुमारे ३० ते ३५ जण जखमी झाले. लझरी बस आणि कंटेनरच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत असून सुप्यातील खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुरुवारी विवाह मुहूर्त असल्याने नगर-पुणे महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी होती.  पाथर्डी तालुयातील कासार पिंपळगाव येथील राजळे परिवारातील वर्‍हाडी मंडळी लझरी बसमधून आळंदीकडे विवाह सोहळ्यासाठी निघाली होती. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच भीषण अपघातात बदलला आणि वर्‍हाडींवर दुःखाचा डोंगर कोसळला.  जालना येथून पुण्याकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार (एमएच २० जीई १७८४) अचानक लझरी बसला हुल देत पुढे गेली. मागून येणार्‍या लझरी बस (एमएच १६ डीके ६०५१) चालकाने कारला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटले आणि लझरी बस थेट रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने पुण्याहून नगरकडे येणार्‍या कंटेनर (एचआर ३८ एडी ००६८) वर आदळली.

लझरी बस आणि कंटेनरमधील धडक अत्यंत भीषण होती. अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. धडकेनंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. लझरी बस आणि कंटेनरचे चालक वाहनांमध्ये अडकून पडले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही चालकांना बाहेर काढले.लझरी आणि कंटेनरच्या धडकेनंतर महामार्गावर अचानक वाहने थांबली. त्याचवेळी कंटेनरच्या मागून नगरकडे येणारी एसटी बसही वेगात येऊन कंटेनरला धडकली. या अपघातात एसटी बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघाताला कारणीभूत ठरलेली स्विफ्ट डिझायर कार मात्र रस्त्यालगतच्या शेतामध्ये जाऊन थांबली.

हे सुद्धा वाचा :  अहिल्यानगरमध्ये दोन दिवस वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’; कुठे पडणार पाऊस पहा

जखमींच्या मदतीला धावले खासदार लंके
अपघाताची माहिती मिळताच पारनेर येथे कार्यक्रमात व्यस्त असलेले खा. नीलेश लंके यांनी थेट सुप्यातील रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमींची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. संबंधित डॉटरांशी चर्चा करून सर्व जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळतील, याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच जखमी वर्‍हाडी मंडळींच्या नातेवाईकांनाही धीर दिला.

दोन तासांनंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत
भीषण अपघातामुळे नगर-पुणे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. जवळपास दोन तासानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

जखमींना रुग्णवाहिकांतून सुप्यात हलविले
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, सुपा पोलिस आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महामार्गावर तुटलेल्या काचा आणि वाहनांचे विखुरलेले अवशेष पाहून परिसर सुन्न झाला होता. जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी पाच रुग्णवाहिकांच्या माध्यमातून सुप्यातील निरामय हॉस्पिटल आणि दत्त हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. काही जखमींना डोयाला व हातापायांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले.

 

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ