पारनेर | नगर सह्याद्री
कांदा उत्पादक शेतकर्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर टाकळी ढोकेश्वर येथे रस्ता रोको आंदोलन करणार्या आंदोलकांना आंदोलन भोवले. पारनेर पोलिसांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे सरपंच रवींद्र राजदेव यांच्यासह १५ प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि इतर ४० ते ५० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग अडवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि विनापरवाना आंदोलन छेडणे या कारणांवरून पोलिसांनी ही कायदेशीर कारवाई केली आहे. पारनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी नांदूर पठारचे सरपंच रवींद्र राजाराम राजदेव यांच्यासह काताळवेढा येथील पोपट गुंड, भोंद्रे येथील सरपंच अभिजित झावरे, सरपंच प्रकाश गाजरे, बाबासाहेब बांडे आणि टाकळी ढोकेश्वरचे दत्तात्रय झावरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे सावरगावचे संतोष चिकणे, निघोजचे जालिंदर लंके, नितीन खोडदे, खडकवाडीचे संतोष शिंदे, चोंभूतचे दादाभाऊ खांडकर, रफिक शेख, कासारे येथील पोपटराव नरड, सतीश भालेकर आणि नांदूर पठारचे रवींद्र बबन चौधरी यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. या १५ जणांशिवाय आंदोलनात सहभागी असलेल्या इतर ४० ते ५० अज्ञात आंदोलकांवरही नाव आणि गाव माहिती नसल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस कारवाईनंतर राजकीय वातावरण तापणार?
शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणे हा अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः या आंदोलनाची दखल घेतली असताना, पोलिसांनी केलेली ही कारवाई दुर्दैवी आहे. आम्ही या कारवाईचा तीव्र निषेध करतो. सरकारने शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास, आगामी काळात पूर्ण पारनेर तालुयात आणि जिल्ह्यात तीव्र राजकीय पडसाद उमटतील आणि हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटना व स्थानिक नेत्यांनी दिला आहे.










