राहुरी | नगर सह्याद्री
चार कोंबड्यांना ठार मारुन सात अंडे गिळंकृत करणाऱ्या अति विषारी कोब्रा नागाला वीस मिनीटाच्या प्रयत्नानंतर जेरबंद करण्यात आले.
तालुक्यातील आरडगाव येथील विकास देशमुख यांच्या घरासमोरील अंगणात रविवारी रात्री 11 वाजे दरम्यान ही घटना घडली. देशमुख कुटुंब रात्रीचे जेवण आटोपून झोपण्याच्या तयारीत असताना कोंबड्यांचा मोठा आरडाओरडा झाला. हा आवाज कानी पडताच देशमुख यांनी घराबाहेर येऊन बॅटरीच्या प्रकाश झोतात अंगणात पाहणी केली असता चार कोंबड्या तडफड करत मृत्यू झाल्याचे दिसून आले.

कोंबड्यांना दंश करणारा कोब्रा नाग कोनाड्यात असलेल्या कोंबड्यांच्या खुराडयात जावुन बसला होता. या नागाला बाहेर काढण्याचा प्रयत्न देशमुख यांनी केला मात्र तो व्यर्थ ठरल्याने राहुरी येथील सर्पमित्र कृष्णा पोपळघट यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. सर्पमित्र पोपळघट यांनी 20 मिनीटाच्या प्रयत्नानंतर कोब्रा नागाला खुराडयातुन बाहेर काढले. एका पाठोपाठ सहा अंडे गिळंकृत केल्याने नागाची सुस्त अवस्था झाली होती.गिळंकृत केलेले सहा अंडे तोंडावाटे बाहेर फेकल्या नंतर कोब्रा नागाला प्लास्टिक डब्यात जेरबंद करण्यात आले. यावेळी देशमुख कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सर्पमित्र कृष्णा गायकवाड यांन्ी या नागाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.










