शेवगावात पोलिसांची कारवाई
दोन आरोपी जेरबंद
शेवगाव | नगर सह्याद्री
शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी दोन धडक कारवाया करत अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. मळेगाव शिवारातील ढोरा नदी पात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत शेवगाव शहरातील सम्राट अशोकनगर भागात गोमांस विक्री करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 5 लाख 92 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पहिल्या कारवाईत 14 मे रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास मळेगाव शिवारातील ढोरा नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैधरित्या वाळूची चोरी व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाने दोन खासगी पंचांना सोबत घेऊन खासगी वाहनाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. चालक भागवत लक्ष्मण गर्जे (वय 42, रा. मळेगाव, ता. शेवगाव) याला ताब्यात घेतले आहे.5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर,30 हजार रुपये किमतीची ट्रॉली, 10 हजार रुपये किमतीची 1 ब्रास शासकीय वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संपत नवनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप आव्हाड करत आहेत.
दुसरी कारवाई 15 मे रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास शेवगाव शहरातील सम्राट अशोकनगर भागात एक इसम त्याच्या घराच्या पाठीमागे गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व तपास पथकाने तात्काळ पंचांसह मोहम्मद कैफ फय्याज सौदागर (वय 24, रा. सम्राट अशोकनगर, शेवगाव) याच्या घरावर छापा टाकला.
पोलिसांना घराच्या मागील भागात गोवंश जनावरे कापून त्यांचे मोठे तुकडे करून ठेवलेले आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष सर्व मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ दिलीप शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आबासाहेब गोरे करत आहे.










