उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार, मंत्री विखे राहणार उपस्थित | निळोबाराय भक्तनिवासमध्ये पालखी सोहळा नियोजनाची बैठक
पारनेर | नगर सह्याद्री –
श्रीक्षेत्र पिंपळनेर ते पंढरपूर पायी दिंडी पालखी सोहळ्याचे शुक्रवार दि. १० जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता निळोबारायांच्या राहत्या वाड्यातून प्रस्थान होणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनीताई पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी यांच्यासह हजारो वारकरी उपस्थित राहणार आहेत.
पंढरपूर येथील आषाढी सोहळ्यात नऊ क्रमांकाची मानाची दिंडी म्हणून ओळख असणार्या निळोबाराय पालखी सोहळ्याची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. पिंपळनेर येथील निळोबाराय भक्तनिवासामध्ये निळोबाराय पालखी सोहळा प्रमुख हभप गोपाळ बुवा मकाशीर यांच्या अध्यक्षतखाली बैठक पार पडली. निळोबारायांच्या संजीवनी समाधी मंदिरातून पंढरपूरकडे दिंडीचे प्रस्थान होणार असल्याची माहिती निळोबाराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दिली.
हभप दत्तात्रय महाराज फकीर लवारे यांनी मागणी केली की, महिला कीर्तनकारांना एकतरी कीर्तनाची संधी मिळावी. दामोदर ठुबे या वारकर्यांनी सूचना मांडली की, चालूवर्षी गॅस टंचाई असल्यामुळे दिंडी सोहळ्याच्या मुक्कामी गॅस टंचाई जाणवू नये, त्यामुळे पुरेसा साठा बरोबर घ्यावा.
राजेंद्र पठारे यांनी सांगितले की, ज्यावेळी पालखी सोहळा पंढरपूराच्या जवळ जातो. त्यावेळी पाऊस सुरू झालेला असतो परंतु मुक्कामाच्या ठिकाणी असणारे मंडप गळके असल्याने वारकर्यांची मुक्कामाच्या ठिकाणी गैरसोय होती. ती होऊ नये म्हणून चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे मंडप मिळावेत जेणेकरून वारकर्यांची गैरसोय होणार नाही. चालूवर्षी रथासाठी रुई छत्रपती दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष बंडूशेठ बापूराव साबळेकडून बैलजोडी देण्यात आली. नगारा बैलगाडीसाठी सिद्धेश्वर पायी दिंडी सोहळाचे हभप अण्णासाहेब चत्तरकडून बैल जोडी देण्यात आली.
या नियोजन बैठकप्रसंगी संपत त्रिंबक गाजरे पाटील, विजय गुगळे, राजेंद्र पठारे, जवळे सेवा संस्थेचे अध्यक्ष नाथा रासकर, विठ्ठल मंदिर संस्था सचिव गोरख सालके, देवस्थान ट्रस्ट सचिव लक्ष्मण खामकर, सेवा संस्था ट्रस्ट सचिव चांगदेव शिर्के, माजी सरपंच भाऊसाहेब लंटाबळे, विणेकरी पांडुरंग रासकर, माजी सरपंच पांडुरंग सातपुते तसेच पिंपळनेर ग्रामस्थ व पालखी सोहळ्यात सहभागी होणारे दिंडी चालक अध्यक्ष व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.










