‘साई द्वारका’व मनपा यांच्या वतीने उपमहापौर अॅड.जाधव यांच्या संकल्पनेतून ‘ग्रीन सिटी’चे उद्घाटन
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरांचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, वाहनांची प्रचंड वाढ आणि बदलती जीवनशैली यामुळे पर्यावरणीय समतोल बिघडत असून प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धनाची व्यापक आणि सातत्यपूर्ण लोकचळवळ उभारणे अत्यंत आवश्यक असून उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी ग्रीन सिटी राबवण्याचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
साई द्वारका सेवा ट्रस्ट व अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘नामदार राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी’ मोहिमेचा भव्य शुभारंभ शहरातील माऊली सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या मोहिमेअंतर्गत पुढील एका वर्षात शहरात एक लाख वृक्ष लागवड व त्यांच्या संगोपनाचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष कौतुक केले. कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, उपमहापौर अॅड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नितीन दिनकर, विनायकराव देशमुख, राजाभाऊ मुळे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती वर्षा सानप, शहराध्यक्ष अनिल मोहिते, माजी उपमहापौर अनिल बोरुडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, नगरसेवक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने अन्य नागरिक उपस्थित होते.
प्रदूषण ही केवळ पर्यावरणाची नव्हे तर मानवी आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये प्रदूषणाने धोकादायक पातळी गाठली आहे. अहिल्यानगरने वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गाची होत असलेली हानी अधोरेखित करत वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता न राहता तिचे संगोपन व संवर्धन अधिक महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्री विखे यांनी स्पष्ट केले. केवळ रस्ते, इमारती व पायाभूत सुविधा उभारणे म्हणजे विकास नव्हे, तर हरित क्षेत्र वाढविणे, जलस्रोतांचे संरक्षण करणे आणि प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करणे ही खरी विकासाची दिशा आहे. प्रत्येक प्रभागात ‘ग्रीन स्पेस’ निर्माण करून नागरिकांना शुद्ध हवा आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून उपमहापौर जाधव यांच्या ग्रीन सिटीच्या प्रयत्नांना नगरकरांनी साथ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार संग्राम जगताप यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, वृक्षारोपणाबरोबरच त्याचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लोकसहभागाशिवाय ही मोहीम यशस्वी होऊ शकत नाही. अनेकदा वृक्षारोपण केले जाते; मात्र त्याची निगा राखली जात नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने सहभाग घेतल्यास ‘ग्रीन सिटी’चे स्वप्न साकार होईल. उपमहापौर अॅड. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविकात मोहिमेची सविस्तर माहिती देताना सांगितले की, शहरातील सर्व १७ प्रभागांमध्ये नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने भारतीय प्रजातींची सुमारे १० फूट उंचीची झाडे लावण्यात येणार आहेत. मोठी रोपे लावल्यामुळे त्यांचे संगोपन व संवर्धन सुलभ होणार असून झाडे जगण्याचे प्रमाण देखील वाढणार आहे.
कार्यक्रमास बाळासाहेब पवार, अशोक गायकवाड, मनोज कोतकर, निखिल वारे, सुरेश बनसोडे, पुष्पाताई बोरुडे, शारदाताई ढवण, गीतांजली काळे, रवींद्र बारस्कर, सतीश शिंदे, जालिंदर कोतकर, महेश लोंढे, दत्ता गाडळकर, अनिल ढवण, मनोज लोंढे, विजय पठारे, करण कराळे, वैभव सुरवसे, राजेंद्र पवार, प्रताप काळे, बाली बांगरे रोशनी त्रिंबके सुजाता पडोळेयांसह विविध मान्यवर, पदाधिकारी, विद्यार्थी व अन्य नागरिक उपस्थित होते. या मोहिमेत तिरंगा फाउंडेशन, निरंजन सेवाभावी संस्था, गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान – घर घर लंगर सेवा, जैन ओसवाल युवक संघ – जॉईज, जाणीव फाउंडेशन, सी ए इंडिया, श्री बडीसाजन ओसवाल युवक संघ, हरिभूमी प्रतिष्ठान, हरियाली संस्था यांसह अनेक सेवाभावी संस्था व वृक्षप्रेमी सहभागी झाले आहेत. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले निखिल वारे यांनी आभार मानले.










