कान्हूर पठार | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात ज्ञानाऐवजी जात विचारली जाते. महापुरुषांचे नावे घेऊन राजकारण केले जाते. संविधान प्रत्येकाच्या घरात असले पाहिजे व ते वाचले पाहिजे, असे सांगत कान्हूरपठार (ता.पारनेर) हे गाव हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार सुधारणावादी विचारवंत पेगंबर शेख यांनी काढले.
कान्हूरपठार येथे आषाढी वारी एकादशी निमित्ताने आयोजित प्रवचनात ते बोलत होते. गावामध्ये विठ्ठल मंदिर व मशीद यांची एकच भिंत आहे. आषाढी वारीनिमित्ताने मुस्लिम समाजाने प्रवचनाचे आयोजन केले होते. गावातून जाणाऱ्या दिंडीचे स्वागत फुले उधळून करण्यात आले. यावेळी विचारवंत पेगंबर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थ, पदाधिकारी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
गावामधून जाणाऱ्या संत निळोबाराय पायी दिंडी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांचे पांडुरंग प्रासादिक भजनी मंडळाने भक्तीभावाने स्वागत केले. अश्वाचे गोल रिंगणही याप्रसंगी पार पडले. पायी दिंडी सोहळ्यासाठी भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्यावतीने 22 हजार रुपयांची देणगी देण्यात आली.










