नाशिक / नगर सह्याद्री –
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. ज्या प्रकरणाला एका भोंदूबाबाकडून केली जाणारी फसवणूक म्हणून पाहिलं जात होतं, त्यामागे आता एक संघटित गुन्हेगारी रॅकेट असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. विशेष पोलीस पथकाच्या तपासात जे खुलासे झाले आहेत, ते पाहून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. स्वतःला ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणारा अशोक खरात हा निरागस आणि अडचणीत सापडलेल्या महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. कौटुंबिक कलह, नोकरीची समस्या किंवा घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या महिलांना तो मानसिक आधाराचे आमिष दाखवत असायचा. मात्र, या आध्यात्मिक ओढ्यामागे त्याचा लैंगिक शोषण आणि आर्थिक लुटीचा काळा डाव दडलेला होता.
विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे ज्यांना देवाचे रूप म्हटले जाते अशा उच्चशिक्षित डॉक्टरांचाही अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांमध्ये सहभाग असल्याचं समोर आलं आहे.
कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा या डॉक्टरांच्या माध्यमातून पुरवला जात होता, अशी प्राथमिक माहिती पुढे येत आहे. भोंदू खरात याच्या सांगण्यावरून हे डॉक्टर वैद्यकीय नीतिमत्ता धाब्यावर बसवून महिलांच्या जीवाशी खेळत होते. नाशिकमधील एका दिग्गज राजकीय नेत्याचा डॉक्टर जावई याचा देखील या रॅकेटमध्ये सहभाग होता. राजकीय वजनाचा वापर करून या डॉक्टरने केवळ या अवैध कामांना संरक्षणच दिले नाही तर, यातून कोट्यवधींची माया जमा केली. धक्कादायक म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही एका बड्या नेत्याने या भोंदू खरातची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामुळे तपासाची सुई आता बड्या नेत्यांकडे वळण्याची शक्यता आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपात सुरू असताना मात्र संबंधित प्रशासनाला याबाबत कुठलीही माहिती कशी नव्हती, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या एका बड्या आरोग्य अधिकाऱ्याचा अशोक खरातच्या या रॅकेटला थेट वरदहस्त होता. या अधिकाऱ्याच्या दबावामुळे आरोग्य विभागाने कधीही या संशयास्पद सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी केली नाही, अशी देखील माहिती आहे. आता या अधिकाऱ्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. SIT च्या पथकाने या प्रकरणाचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान,जप्त करण्यात आलेले फुटेज, कॉल डिटेल्स आणि पीडितांच्या जबाबावरून हे स्पष्ट झाले आहे की, हे केवळ एक स्थानिक रॅकेट नसून याचे धागेदोरे जिल्ह्याबाहेरही असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत नक्की कोणाकोणावर कारवाईचा फास आवळला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.










