बीड / नगर सह्याद्री –
बीडमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षीय तरुणीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. इतकेच नाही तर पीडित तरुणीकडून तीन लाख रुपयांसह साडेनऊ तोळे सोने उकळले. असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एक २० वर्षीय तरुणी स्वरा (बदलेलं नाव ) अंबाजोगाई येथे एका नामांकित कॉलेजमध्ये शिकत होती. या दरम्यानच्या काळात तिची ओळख महेश करपे आणि पवन कराड या दोन तरुणांशी झाली. ओळख वाढल्यानंतर दोघेही तिचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीनुसार, महेश करपे याने तरुणीचा पाठलाग करून तिला जबरदस्तीने मंच्युरियन खाण्यासाठी दिले. ते खाल्ल्यानंतर तिला गुंगी आली. त्यानंतर तरुणी बेशुद्ध पडल्याचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय, दुसरा आरोपी पवन कराड यानेही तरुणीला गुंगीचे औषध देऊन पुणे येथील एका लॉजवर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केले. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी तरुणीचे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली. या माध्यमातून तिला ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच आरोपींनी धमकावून पीडित तरुणीकडून सुमारे तीन लाख रुपये आणि साडेनऊ तोळे सोने घेतल्याचेही समोर आले आहे.
अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. शनिवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे अंबाजोगाईसह संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.










