अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणार्या सराईत आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून आरोपींकडून १० गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून तब्बल ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात २१ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी सौ. ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते.
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असता, हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवानजी काळे (रा. वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर) याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकोडी गावाजवळील जुना जकात नाका परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे दोन मोटारसायकलजवळ संशयित इसम उभे असल्याचे दिसून आले. पोलिस पथक जवळ जाताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यामध्ये गणेश दिवान काळे (वय २८, रा. वाकोडी, अहिल्यानगर), विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळुंज, अहिल्यानगर), रोहित लल्या भोसले (वय २३, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे. सखोल चौकशीत आरोपींनी आणखी गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून ९ लाख ४ हजार ८०० रुपये किमतीचे १०२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन आणि १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.तपासादरम्यान आरोपींकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले १० गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. आरोपी गणेश काळे आणि रोहित भोसले हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरोधात यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.सदर आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.










