अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
सोशल मीडियावर खासदार निलेश लंके यांच्या विरोधात व्हिडिओ पोस्ट केल्याच्या रागातून एका तरुणाचे पुण्यातील खराडी भागातून अपहरण करून त्याला अहिल्यानगर जिल्ह्यात अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी किशोर महादेव परभणे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीने खासदार निलेश लंके यांच्याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता. याचाच राग मनात धरून आरोपी प्रणय विजय मोरे, शरद खंडू पवार, मारुती देवराम कोकाटे (दोघे रा. चिचोंडी पाटील), रॉबीन सिंग आणि एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीचे पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कारमधून अपहरण केले.
आरोपींनी किशोर यांना चिचोंडी पाटील येथील हरिओम हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका खोलीत डांबून ठेवले. तिथे त्यांचे कपडे काढून, हात-पाय बांधून लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करण्यात आली. आरोपींनी पीडित तरुणाला जबरदस्तीने संडास साफ करायला लावून अमानुषपणे लघवी पाजल्याचा खळबळजनक आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या अमानवीय कृत्याचा व्हिडिओ बनवून त्यांना धमकावण्यात आले. या घटनेनंतर आरोपींनी फिर्यादीला बीड जिल्ह्यातील अंभोरा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या मर्जीविरोधात काही कागदपत्रांवर लिहून घेतले. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून नगर तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भिंगारमध्ये तलवार बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भिंगार / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर शहरात विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर रस्त्यावरील भुईकोट किल्ल्याजवळ लोखंडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला भिंगार कॅम्प पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत एक तरुण तलवार घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ तपास पथकाला सोलापूर रस्त्याकडे रवाना केले. पोलिसांनी सापळा लावला असतानाच उदय अब्राहम ढगे (वय २२, रा. शांतीनगर, केदारवस्ती) हा तरुण हातात धारदार तलवार घेऊन येताना दिसला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्यास जागीच पकडले.
तपास पथकाने पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी तलवार मिळून आली. शस्त्राबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. याप्रकरणी पोलिसांनी उदय ढगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
जुन्या वादातून तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील टिळक रोड परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाला दुचाकीवर नेऊन सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकोडी येथील रहिवासी आयुष गुलाब पवार हा तरुण आपल्या खासगी कामात व्यस्त असताना आरोपींनी त्याला गाठले. पूर्ववैमनस्यातून युवराज भिंगारदिवे, अभिषेक शेलार आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर चार अनोळखी साथीदारांनी आयुषला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून लकडी पुलाच्या परिसरात नेले. तिथे बेकायदेशीर जमाव जमवून आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
रागाच्या भरात आरोपींनी लाकडी दांडक्याने आयुषला मारहाण केली, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. “आमच्या नादी लागला तर जिवे मारून टाकीन,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडित तरुणाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप पितळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
जुन्या वादातून दुकानदारावर जीवघेणा हल्ला; १८ हजारांची रोकड गहाळ
अहिल्यानगर: भिंगार येथील मिरवली पहाड परिसरात एका दुकानदारावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी खालीद अब्दुल गफुर शेख (वय ४३, रा. आलमगीर) हे १ मे रोजी सायंकाळी आपल्या दुकानावर असताना ही घटना घडली. संशयित आरोपी शेख शेम्स उर्फ सोनु याने फिर्यादीला पाठीमागून घट्ट धरून ठेवले. त्यानंतर शेख अली बागवान याने हातातील धारदार शस्त्राने फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूला वार करून गंभीर जखमी केले. याचवेळी शेख मोईन बागवान याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या कंबरेवर प्रहार केला.
हल्लेखोरांनी ‘पुन्हा आमच्या नादी लागला तर जिवे मारू’ अशी धमकी देऊन घटनास्थळावरून पळ काढला. या झटापटीत फिर्यादीची १८ हजार रुपयांची रोकड गहाळ झाली असून मोबाईलचेही नुकसान झाले आहे. जखमीवर श्रीदीप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी शेख मोईन, शेख अली आणि शेख शेम्स यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे हे करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील कोठला परिसरात राजचेंबर समोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकनाथ काशीनाथ चव्हाण यांचा मृत्यू झाला असून, धडक देऊन चालक वाहनसह पसार झाला आहे.
याप्रकरणी राजू काशीनाथ चव्हाण यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, २९ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास त्यांचे भाऊ एकनाथ चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एमएच १७ बीटी ३४२०) रस्ते मार्गावरून जात होते. यावेळी एका अज्ञात वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत आपले वाहन अविचाराने व भरधाव वेगाने चालवून एकनाथ यांच्या दुचाकीला पाठीमागून भीषण धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे एकनाथ चव्हाण यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अज्ञात चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पूनम श्रीवास्तव करत आहेत. पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे फरार वाहनाचा शोध घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक अधिक तपास करत आहे.










