मुंबई / नगर सह्याद्री –
बॉलिवूड अभिनेत्री जाह्नवी कपूर हिने पापाराझींच्या काम करण्याच्या पद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः महिलांच्या शरीराच्या विशिष्ट भागांवर कॅमेरा झूम करून फोटो किंवा व्हिडिओ शूट करण्याच्या प्रकारावर तिने स्पष्ट शब्दांत टीका केली आहे.
राज शमानी यांना दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिच्या बॉडी पार्ट्सवर लक्ष केंद्रीत करणे हे सरळ खाजगीपणाचे उल्लंघन आहे
जान्हवीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तिने स्वतः पापाराझींशी संवाद साधून त्यांना त्यांच्या कामातील मर्यादा समजावण्याचा प्रयत्न केला. “तुम्ही जे करत आहात ते केवळ आमच्यासाठीच नाही तर तुमच्या स्वतःच्या प्रतिमेसाठीही हानिकारक आहे,” असे तिने त्यांना स्पष्टपणे सांगितले.
तिने फोटोग्राफर्सना प्रश्न विचारत म्हटले की, “काही पैसे किंवा जास्त व्ह्यूजसाठी एखाद्या महिलेच्या शरीराला वस्तूप्रमाणे दाखवणे योग्य आहे का? अशा पद्धतीने काम केल्याने तुम्हाला स्वतःचा सन्मान वाटतो का?”
तिने उदाहरण देताना तिच्या ‘भीगी साडी’ गाण्याचा उल्लेख केला. त्या गाण्यातील सेंसुअल भूमिका ही तिच्या इच्छेने आणि चित्रपटाच्या गरजेनुसार स्वीकारली होती. मात्र, वैयक्तिक आयुष्यात तिला आपल्या पसंतीचे कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे ती म्हणाली.
“मी रस्त्यावर बाहेर पडते तेव्हा माझ्या परवानगीशिवाय माझ्या शरीरावर कॅमेरा झूम करून व्हिडिओ बनवणे, त्यावर स्लो मोशन किंवा विचित्र म्युझिक टाकून व्हायरल करणे अजिबात योग्य नाही,” असे ती ठामपणे म्हणाली.

यासोबतच तिने चित्रपटांच्या सेटवरील कामाच्या पद्धतीवरही भाष्य केले. “कोणत्याही सीनसाठी किंवा कॅमेरा अँगलसाठी कलाकाराची स्पष्ट सहमती असणे गरजेचे आहे. एखादा अँगल अस्वस्थ वाटत असेल, तर नकार देण्याचा अधिकार कलाकाराला आहे. त्यासाठी ‘अनप्रोफेशनल’ ठरवणे चुकीचे आहे,” असेही तिने सांगितले.
या सर्व वक्तव्यांमधून जान्हवी कपूर ही अशा प्रकारांमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मते, ग्लॅमरस दिसणे किंवा विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे याचा अर्थ असा नाही की कोणालाही तिच्या शरीराचा वापर ‘कंटेंट’ म्हणून करण्याचा अधिकार मिळतो.










