- जाहिरात -spot_img
breaking news

उष्णतेच्या लाटांचा फटका; देशात ‘हॉटस्पॉट’ वाढले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
देशात उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि भौगोलिक विस्तार झपाट्याने वाढत असून, देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटांची ठिकाणे (हॉटस्पॉट) तयार होत असल्याचे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. उष्णतेच्या लाटांच्या अभ्यासासाठी ‘हीटवेव्ह हॉटस्पॉट इंडेक्स’ विकसित करण्यात आला असून, गेल्या ४० वर्षांत उष्णतेच्या लाटांच्या परिणामक्षेत्राचा विस्तार दीडपटीने वाढल्याचे संशोधनात आढळले आहे.

पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा शोधनिबंध ‘सायंटिफिक रिपोर्ट्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. बी. पद्मकुमारी, श्रावणी बॅनर्जी, एम. व्ही. रमणा या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग होता. संशोधनात १९८१ ते २०२० या ४० वर्षांच्या कालावधीत भारतातील उन्हाळी हंगामातील दररोजच्या कमाल तापमानाच्या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात आले. या कालावधीत देशातील उन्हाळ्यातील सरासरी कमाल तापमानात सुमारे १.० ते ०.१२ अंश सेल्सिअस वाढ झाल्याचे आढळून आले. जागतिक तापमानवाढ हे त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटांची वारंवारिता, कालावधी आणि भौगोलिक विस्तार वाढला आहे.

एल निनो-एन्सोचा प्रभाव
हवामानातील महत्त्वाचा घटक असलेल्या एल निनो-एन्सो यांचा प्रभावही तपासण्यात आला. त्यातून ‘एल निनो’च्या काळात उष्णतेच्या लाटांची तीव्रता अधिक वाढत असल्याचे दिसून आले. १९८१–२००० या कालावधीच्या तुलनेत २००१–२०२० दरम्यान उन्हाळी कमाल तापमानात १.०३ ते ०.४४ अंश सेल्सिअस वाढ झाली, तर एन्सो तटस्थ असतानाच्या काळातील तापमानवाढ ०.७७ ते ०.२० अंश सेल्सिअस होती. देशात मोसमी पावसाच्या आधीच्या काळात कमाल तापमान अधिक वेगाने वाढत असल्याने गेल्या काही दशकांत सर्वाधिक तीव्र उष्णतेच्या लाटांची नोंद होत आहे.

उष्णतेच्या लाटांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘हीटवेव्ह हॉटस्पॉट इंडेक्स’ विकसित केला. या निर्देशांकाच्या साहाय्याने उष्णतेच्या लाटांचा सर्वाधिक फटका बसणारे भाग निश्चित करण्यात आले. त्यातून मध्य भारतातील मैदानी प्रदेश, आग्नेय किनारपट्टी, पश्चिम भारतातील काही भाग, तसेच गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालसारखी राज्ये उष्णतेच्या लाटांमुळे सर्वाधिक धोक्यात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा :  इराणची हादरवणारी धमकी, थेट म्हटले, काहीही झाले तरीही मागे हटणार नाही

देशातील जवळपास ६० टक्के जिल्ह्यांना २०११ ते २०२० या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा फटका बसला. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम मध्य प्रदेश, झारखंड अशा राज्यांवर सर्वाधिक परिणाम झाला. तसेच, उपग्रहाधारित वनस्पती निर्देशांक आणि भूपृष्ठ तापमान यांच्या आधारे केलेल्या विश्लेषणानुसार १९८१ ते २००० आणि २००१ ते २०२० या दोन कालखंडांमध्ये देशातील उष्णतेच्या लाटांचे ‘हॉटस्पॉट’ सुमारे दीडपटीने वाढले. वाढत्या उष्णतेमुळे उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढण्याचा इशाराही अभ्यासातून देण्यात आला आहे.

‘संशोधनातील निष्कर्षांच्या आधारे स्थानिक स्तरावर उष्णता कृती आराखडे तयार करणे, शहरी नियोजनात हरित क्षेत्र वाढवणे आणि आरोग्य यंत्रणा अधिक सज्ज करणे अत्यावश्यक ठरणार आहे. हवामान बदलाचा वाढता प्रभाव लक्षात घेता भविष्यात उष्णतेच्या लाटांचे संकट अधिक गंभीर होऊ शकते,’ असेही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

उष्णतेच्या लाटा दीर्घ काळ टिकणाऱ्या, तीव्र स्वरूपाच्या होत आहेत. त्यांचा भौगोलिकदृष्ट्या विस्तारही होत आहे. या लाटांची वारंवारिता आणि तीव्रताच केवळ वाढत नाही, तर त्यांच्या ‘हॉटस्पॉट’ क्षेत्रांमध्येही भौगोलिक बदल होत आहेत. त्यामुळे आरोग्याचे धोके वाढत आहेत. या बदलांचा सखोल अभ्यास करून उष्णतेच्या लाटांचा परिणाम होणाऱ्या भागांतील लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने धोरणे विकसित करणे अत्यावश्यक आहे. – बी. पद्मकुमारी, शास्त्रज्ञ, आयआयटीएम

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ