पाणीउपसा रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागासाठी वरदान ठरलेले मांडओहळ धरण सध्या तीव्र उन्हाळा आणि वाढत्या पाणी उपशामुळे आटत चालले आहे. धरणाने तळ गाठला आहे. तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, मान्सूनच्या आगमनाला अजून काही दिवसांचा अवधी बाकी आहे. अशा स्थितीत उत्तर भागाची तहान भागवणाऱ्या या धरणातील उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
मांडओहळ धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता 399 दशलक्ष घनफूट आहे. मात्र, सध्या धरणात केवळ 65 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक राहिले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या धरणाचा एकूण मृतसाठा 90 दशलक्ष घनफूट असून, चालू साठा हा मृतसाठ्यापेक्षाही खाली गेल्याने चिंता कमालीची वाढली आहे.
सध्या पडणारे प्रचंड ऊन आणि वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यातच, धरण परिसरात अजूनही छुप्या पद्धतीने पाणी उपसा सुरू असल्याने शिल्लक साठा वेगाने खाली जात आहे. एकीकडे टँकर फेऱ्या आणि पाणी योजनांसाठी पाण्याची मागणी वाढत असताना, दुसरीकडे होणारी घट चिंताजनक आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने धरण परिसरातील सर्व प्रकारचा शेतीचा पाणी उपसा तातडीने आणि सक्तीने बंद करावा. धरणावर चोवीस तास कडक बंदोबस्त किंवा गस्त ठेवावी, जेणेकरून पाण्याचा थेंब अन् थेंब केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवता येईल. जर आताच कठोर पावले उचलली नाहीत, तर पारनेरचा उत्तर भाग येत्या 15 दिवसांत पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर बनेल.
पाणी नियोजनाची तीव्र गरज
पाऊस लांबणीवर पडल्यास निर्माण होणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच या 65 दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. धरण परिसरातील अवैध पाणी उपसा त्वरित थांबवून, उपलब्ध साठा केवळ पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
अनेक गावांची तहान धरणावर
या धरणावर परिसरातील अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या अवलंबून आहेत. सध्या धरणावरून वासुंदे, कर्जुले हऱ्या, टाकळी ढोकेश्वर या प्रमुख गावांच्या प्रादेशिक पिण्याच्या पाणी योजना सुरू आहेत. याशिवाय, तालुक्यातील अनेक गावांमधे पाणीटंचाई जाणवू लागल्याने प्रशासनाने टँकर सुरू केले आहेत. या शासकीय टँकरचा मुख्य उद्भव देखील मांडओहळ धरणाजवळच असल्याने धरणावरील पाण्याचा ताण प्रचंड वाढला आहे.










