संवत्सर येथील तरुणावर गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र कृषी खात्याची बनावट ’चंदन रत्न’ आणि ’ड्रॅगन फ्रूट रत्न’ पदवी धारण केल्याचे भासवून एका डॉक्टरची ११ लाख २४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात कोपरगाव तालुयातील संवत्सर येथील संशयित आरोपी तेजस सतिष शेटे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खिर्डी येथील वैद्यकीय व्यावसायिक नागेश मारुती मेंगडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी तेजस शेटे याने फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला कृषी खात्याकडून विशेष पदवी मिळाल्याचे खोटे सांगितले. त्याने एका ब्लॉगद्वारे कृषी खात्याची बनावट माहिती दाखवून ठराविक जातीच्या चंदनाची लागवड केल्यास मोठे उत्पन्न मिळते आणि त्यास शासन मान्यतेचे प्रमाणपत्र मिळेल, असे आमिष दाखवले. या खोट्या आश्वासनांना बळी पडून मेंगडे यांनी चंदनाच्या रोपांसाठी वेळोवेळी मोठी रक्कम दिली. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. माहिती अधिकारात माहिती मिळवण्यास विलंब झाल्याने ही फिर्याद उशिरा दाखल झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.
पोलीस हवालदार ३५ हजारांची लाच घेताना अडकला जाळ्यात
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि पोलीस ठाण्याचे वारंवार हेलपाटे वाचवण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. अनिल अजिनाथ गोसावी असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
यातील फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार बाळासाहेब गिरी करत असून, त्यांचे मदतनीस म्हणून अनिल गोसावी काम पाहत होते. गोसावी यांनी फिर्यादीला फोन करून चौकशीसाठी बोलावले होते. दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि वारंवार पोलीस ठाण्यात चकरा मारायला लावू नये, या मोबदल्यात गोसावी यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. शेवटी ३५ हजार रुपये देण्याचे ठरले.
फिर्यादीने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाच्या पथकाने गुरुवारी तोफखाना पोलीस ठाणे परिसरात सापळा लावला. तडजोडीनंतर ठरलेली ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार अनिल गोसावी यांना पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी करण्यात आली.
दारूसाठी पैसे न दिल्याने दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी
आदर्श गौतमनगरमधील प्रकार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील आदर्श गौतमनगर परिसरात दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत या कारणावरून एका तरुणाने शेजारी राहणार्या पती-पत्नीला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप बाबूलाल भागुरे (वय ३२) हे आपल्या कुटुंबासह रेल्वे स्टेशन परिसरातील आदर्श गौतमनगर येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भागुरे हे आपल्या घरासमोर उभे असताना, त्यांचा शेजारी सलीम पठाण हा त्या ठिकाणी आला. त्याने भागुरे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र, भागुरे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
या नकाराचा राग मनात धरून आरोपी सलीम पठाण याने भररस्त्यात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने संदीप भागुरे आणि त्यांच्या पत्नीला अतिशय घाण अश्लील शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, ’तुम्हाला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेनंतर घाबरलेल्या भागुरे कुटुंबाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करत आहेत.
वाळकीत महावितरणच्या तंत्रज्ञाला मारहाण
अहिल्यानगर: वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार निवारण करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञाला लाथाबुक्कीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वाळकी येथे घडली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोपान कारभारी नवसुपे हे वाळकी येथे महावितरण कंपनीत तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वाळकी येथील रहिवासी आरोपी दीपक बाळासाहेब भालसिंग यांनी वीजपुरवठा बंद असल्याची तक्रार महावितरणच्या पोर्टलवर केली होती. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी नवसुपे हे दीपक भालसिंग यांच्या घरी गेले होते. तेथे त्यांनी वीज मीटरची पाहणी केली असता, मीटरमध्ये ’लूज कॉन्टॅट’ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.यावेळी नवसुषे यांनी दीपक भालसिंग यांना तुम्ही मीटरमध्ये छेडछाड केली आहे का? अशी विचारणा केली. या विचारणेचा राग आल्याने आरोपी दीपक बाळासाहेब भालसिंग आणि जयेश दीपक भालसिंग या दोघांनी नवसुपे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्कीने मारहाण करत धमकी दिली. या घटनेनंतर सोपान नवसुपे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दीपक भालसिंग आणि जयेश भालसिंग या दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दुचाकी चोरणार्या टोळीचा सुळसुळाट
नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचा एक धाडसी प्रयत्न उघडकीस आला आहे. बुरुड गल्ली परिसरातील काळा मारुती मंदिरासमोर रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या गाड्या चोरताना दोन अज्ञात चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
सेवानिवृत्त नागरिक चंद्रकांत रतनलाल भंडारी (वय ६६) हे आपल्या कुटुंबासह बुरुड गल्लीत राहतात. त्यांच्या घराबाहेर त्यांची ३० वर्षे जुनी दुचाकी उभी होती. १५ एप्रिल रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घराबाहेर काहीतरी हालचाल होत असल्याचे भंडारी यांच्या लक्षात आले. त्यांनी गॅलरीतून पाहिले असता, दोन अनोळखी इसम त्यांच्या गाडीला बनावट चावी लावून ती चालू करण्याचा प्रयत्न करत होते. गाडी चालू न झाल्याने या चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी राहणारे सोमनाथ बबनराव घोरपडे यांच्या दुचाकीकडे वळवला.
भंडारी यांनी तत्काळ आरडाओरडा करून चोरट्यांना हटकले. मालक जागे झाल्याचे पाहून दोन्ही चोरट्यांनी तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोकांच्या मालमत्तेवर डल्ला मारणार्या या दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चंद्रकांत भंडारी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. पोलीस हवालदार सचिन गायकवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.










