- जाहिरात -spot_img
breaking news

बोगस कर्ज प्रकरण भोवले; वडिलांपाठोपाठ मुलाला अटक, काय घडलं पहा

राजे शिवाजी पतसंस्था घोटाळा, ठेवीदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील कान्हूर पठार येथील राजे शिवाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आझाद ठुबे यांचा मुलगा स्वराज आझाद ठुबे याला मंगळवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातून अटक केली आहे. दीड कोटींच्या बोगस कर्जप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, जिल्हा न्यायालयाने त्याला सोमवार दि. २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली. स्वराज ठुबे याने ‘राजे शिवाजी’ पतसंस्थेसह इतरही काही संस्थांमधून मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलल्याचे समोर आले असून, या आर्थिक व्यवहारांच्या मुळाशी जाण्यासाठी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

६० ते ७० कोटींच्या या कथित घोटाळ्यात चेअरमन आझाद ठुबे यांना २१ जुलै २०२४ रोजी त्यांच्या घरातून अटक करण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालक मंडळाने संगनमत करून ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे. लेखापरीक्षण अहवालातून असे स्पष्ट झाले आहे की, चेअरमन, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोणत्याही नियमांचे पालन न करता किंवा विनातारण आपल्या नातेवाईकांना मोठ्या रकमांचे वाटप केले. यात स्वराज ठुबे याच्या नावे दीड कोटींचे बोगस कर्ज दाखवण्यात आले होते.

याप्रकरणी बाळासाहेब तुकाराम वाळुंज यांच्यासह सूर्यभान मेहेत्रे, गोविंद पवार, पोपट भालेकर आणि तान्हाजी खोडदे यांसारख्या अनेक ठेवीदारांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या घोटाळ्याप्रकरणी आझाद ठुबे यांच्यासह उपाध्यक्ष शमशुद्दीन हवालदार, कार्यकारी संचालक संभाजी भालेकर आणि इतर संचालकांसह एकूण १४ जणांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये उदयकुमार सोनावळे, भगवंत उर्फ नंदकुमार ठुबे, विजय काकडे, संतोष ठुबे, भाऊसाहेब नवले, प्रमोद लोंढे, संतोष कोठारी, किशोर शिंदे, साहेबराव जेजुरकर, ज्योती ठुबे आणि सारिका पोपळघट यांचा समावेश आहे. यापैकी काही संचालकांना अटकपूर्व जामीन मिळाला असला, तरी आझाद ठुबे यांची पत्नी आणि इतर नातेवाईक अद्यापही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. स्वराज ठुबेच्या अटकेमुळे या प्रकरणातील आर्थिक गुंतागुंत सुटण्याची शयता निर्माण झाली असून, पोलीस आता अधिक सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  सुपा परिसरात वादळाचा तडाखा, शेतकर्‍यांचे मोठे नुकसान

चार बोगस कंपन्यांची होणार चौकशी
२०२० मध्ये स्थापन केलेल्या फ्रेश ओरिजेन फार्मर प्रोड्युसर कंपनी प्रा. लि. बीड, फिनबेस इन्व्हेस्टमेंट अँड कॅपिटल रिसर्च प्रा. लिमिटेड, बिलडटेस फ्युचर इन्फ्रास्ट्रचर प्रा. लिमिटेड, स्वराज रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन लिमिटेड या चार सेल कंपन्या स्थापन करून त्या माध्यमातून बोगस कर्ज काढून गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. त्यामुळे या चार कंपन्यांची चौकशी केली जाणार असून, कंपन्यांचे संचालकही रडारवर आहेत.

इतर आरोपी पोलिसांच्या रडारवर
राजे शिवाजी पतसंस्था गैरव्यवहारप्रकरणी १३ संचालक, एक मँनेजर व ४२ आरोपी, दीड कोटीचे कर्जदार यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. आतापर्यंत एकूण ५६ आरोपींविरोधात गुन्हे दाखल आहेत. स्वराज ठुबेला दीड कोटी रुपयांच्या बोगस कर्जप्रकरणी अटक केल्याने इतर कर्जदार आरोपी ही आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या रडारवर आहेत. या सर्व आरोपींना अटक होऊन कर्जाची वसुली केल्यास ठेवीदारांना त्यांच्या कष्टाच्या ठेवी मिळण्यास मदत होईल.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ