पाथर्डी | नगर सह्याद्री
यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलत मढी देवस्थान समिती आणि पाथर्डी पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने तालुयातील मढी येथे अतिक्रमण हटावची व्यापक मोहीम राबविण्यात आली. यात्रेपूर्वी झालेल्या या निर्णायक कारवाईमुळे मंदिर परिसरातील मुख्य रस्ते मोकळे झाले असून भाविक आणि ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाची ठाम भूमिका पाहून अनेक अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतल्याचे चित्र दिसून आले.
मढी येथे असलेल्या चैतन्य कानिफनाथ संजीवन समाधी मुळे होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत येथे मोठी यात्रा भरते. राज्यभरातील भटया समाजाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या या यात्रेत दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पौर्णिमा, गुरुवार आणि अमावस्येला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मंदिर परिसरातील रस्त्यांवर प्रचंड ताण निर्माण होत होता. भक्तनिवास आणि मंदिर प्रवेश मार्ग व्यापार्यांच्या अतिक्रमणामुळे अरुंद झाले होते, त्यामुळे भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.देवस्थान समितीकडून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे हटवली जात नसल्याने अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली.
सुमारे ७५ पोलीस कर्मचारी, दोन अधिकारी आणि पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली मोहीम पार पडली. समितीकडून दोन जेसीबी, चार ट्रॅटर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने कारवाई वेगाने पूर्ण झाली. अंदाजे दीडशे व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे हटवली असून श्रीराम चौक ते भक्तनिवास कोपरा आणि तेथून उत्तर दरवाजापर्यंतचा मार्ग पूर्णपणे खुला झाला आहे. गर्दीच्या वेळी सर्वाधिक वाहतूक कोंडी आणि किरकोळ गुन्हेगारी घडणारा हा परिसर असल्याने भाविकांनी दिलासा व्यक्त केला.या मोहिमेत ग्रामपंचायत प्रशासनाचा सहभाग मर्यादित असल्याची चर्चा असली तरी देवस्थान समिती आणि पोलिसांच्या समन्वयातून कारवाई यशस्वी ठरली.
भविष्यात रस्त्यांच्या वर्दळीच्या भागांवर नियंत्रण रेषा आखून त्या बाहेर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकांच्या खुर्च्यांपासून ते रस्त्यावर पथारी लावणार्यांपर्यंत नियमभंग करणार्यांवर कारवाई करून साहित्य जप्त करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.यात्रेदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी प्रांताधिकारी प्रसाद मध्ये यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र वाहतूक व पार्किंग नियोजन तयार करण्यात आले आहे. संबंधित अतिक्रमणधारकांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून यात्रा काळात देवस्थान समितीचे फिरते पथक आणि दोन पोलीस कर्मचारी कायम तैनात राहणार आहेत.देवस्थान समितीचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड, सचिव माधुरी मरकड, विश्वस्त उत्तम मरकड तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी प्रशासनाला सहकार्य करत ठाम भूमिका घेतली.पोलीस निरीक्षक विलास पुजारी म्हणाले, यात्रा काळात भाविकांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही.










