अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील चाँदनी चौक परिसरात एका रिक्षाचालकाकडे खर्चासाठी पैसे मागून ते न दिल्याच्या रागातून आरोपीने लोखंडी कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अकबरअली कामरअली इराणी हे पहाटेच्या सुमारास चाँदनी चौक परिसरात असताना आरोपी जाहीद याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. इराणी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, आरोपीने संतापून त्यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने आपल्याजवळील लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटावर वार केला. या हल्ल्यात फिर्यादी रक्तबंबाळ होऊन जखमी झाले आहेत.केवळ मारहाण करूनच आरोपी थांबला नाही, तर त्याने फिर्यादीला वस्तर्याने कापून टाकण्याची उघड धमकी दिली.
या झटापटीत फिर्यादीच्या खिशातील ७५० रुपये रोख गहाळ झाले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. सहाय्यक फौजदार रेवणनाथ दहिफळे यांनी या घटनेची नोंद केली असून अधिक तपास पोलीस अंमलदार अहमद इनामदार करत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कापूरवाडीत महिलेसह साक्षीदारावर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या कापूरवाडी परिसरात घर रिकामे करण्याच्या कारणावरून एका महिलेला आणि साक्षीदाराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध विविध कलमान्वये कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कापूरवाडीतील महाडूक सेंटर परिसरात पीडित महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. घराच्या जागेवरून असलेल्या वादातून आरोपी शोएब ऊर्फ सोनू जानू शेख, शौकत गुलाब शेख, अरबाज बाबा शेख, असलम बाबा शेख, अजिज गुलाब शेख, इसाल शेख आणि बाबा हबीब शेख यांनी बेकायदेशीर जमाव जमवला. यावेळी आरोपींनी पीडितेला घर खाली करण्यासाठी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी पीडितेवर आणि उपस्थित साक्षीदारावर लाथाबुक्क्यांनी हल्ला चढवला. इतयावरच न थांबता, आरोपींनी धारदार शस्त्राने पीडितेच्या कानामागे आणि छातीवर वार करून तिला गंभीर जखमी केले. तसेच यावेळी सर्वांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. जखमींना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील जबाबानुसार पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगिर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










