स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन आरोपी जेरबंद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
वन विभागाच्या जिल्हा कार्यालयात घडलेल्या धाडसी चंदन चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ही घटना १८ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील वन विभागीय कार्यालयात रात्रपाळीवर असलेले वन मजूर रमेश पोपट शेळके (वय ५८, रा. गुंडेगाव) यांना चार अनोळखी आरोपींनी अशोकाच्या झाडाला बांधून सहाय्यक वन संरक्षक यांच्या निवासस्थानाजवळील सुमारे २० हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे तोडून चोरून नेली. या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक माहिती व गुन्हेगारांची पार्श्वभूमी तपासत छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात शोधमोहीम राबवली.
या कारवाईत मसीद नसीब गोलवाल (वय २४, रा. जंजाळा, ता. सिल्लोड) आणि शाहीदखा अलीखा कलेसे (वय २६) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी इतर दोन साथीदारांच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. असलमखा भुरेखा पठाण व नसीबखा मुनीरखा जोनवाल हे दोघे आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची सीबीझेड मोटारसायकल (क्र. एमएच २८ डब्लू ९७३८) जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.










