शिवबा संघटना व युवा सेनेचा इशारा
निघोज | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना संरक्षित युरियाचे तातडीने वितरण करण्यात यावे, अन्यथा कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवबा संघटना व युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन पारनेर येथील कृषी विभागाला देण्यात आले. या मागणीसंदर्भात खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात व आमदार काशिनाथ दाते यांच्या कार्यालयातही निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नात लक्ष घालून शासनस्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पावसामुळे पेरण्या पूर्ण झाल्या असून बाजरीसह इतर पिकांसाठी सध्या युरियाची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, निघोजसह तालुक्यातील अनेक भागांत युरिया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खत विक्रेत्यांकडे युरियाचा साठा नसल्याचे सांगितले जात असून, कृषी विभागाच्या आदेशानंतरच संरक्षित युरियाचे वितरण करता येईल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शिवबा संघटना अध्यक्ष तथा युवा सेना तालुकाप्रमुख अनिल शेटे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात संरक्षित युरियाचे वितरण करण्याचे आदेश संबंधित विभागाने साठवणदारांना दिले आहेत. मग पुणे जिल्ह्याला एक न्याय आणि अहिल्यानगर जिल्ह्याला दुसरा न्याय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षित युरिया तातडीने वितरित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने मार्ग काढण्याची विनंती करण्यात आली. मात्र, लवकरात लवकर सकारात्मक निर्णय झाला नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवबा संघटना व युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष तथा युवा सेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, दुर्ग संवर्धन परिवाराध्यक्ष राजूभाऊ लाळगे, शांताराम पाडळे, केतन येवले, अमोल ठुबे, गणेश भुकन, दत्ता टोणगे, संतोष कारखिले, चेअरमन किरण सुपेकर, अमोल गाडीलकर, चंद्रशेखर ढवन,राहुल मोरे,महेश मदगे,संतोष बढे, मनोज खोमणे, प्रवीण थोरात, सागर पठारे, दादाभाऊ ढवळे, गणेश साळुंखे, स्वप्निल गोपाळे, विनोद येवले, मोहन पवार, महेश ढवन, मच्छिंद्र लाळगे, संतोष देशमुख, मच्छिंद्र लामखडे, अविनाश लामखडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.










