- जाहिरात -spot_img

नगरचे ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचे निधन

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगरचे ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (वय 63) यांचे आज शनिवारी (6 जून) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाने नगरचा सांस्कृतिक व ऐतिहासिक कोष हरपला आहे. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील अनेकजण उपस्थित होते. त्यांच्या मागे 90 वर्षांची आई श्रीमती कुमुदिनी गोपाळ देशमुख, पत्नी ज्योती भूषण देशमुख, मुलगा मोहित भूषण देशमुख, सून ऋतुजा मोहित देशमुख यांच्यासह दोन बहिणी संगीता विळदकर (नाशिक) व सुलभा चिंचोरे (पुणे) असा परिवार आहे. नगरमधील स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी त्यांचे ते मावस भाऊ होत.

नगरच्या भुईकोट किल्ला परिसरात पर्यटकांना किल्ल्याची ऐतिहासिक माहिती देत असताना भूषण देशमुख यांना सर्पदंश झाला होता. येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या उपचारांमुळे त्यांची प्रकृती बर्‍यापैकी सुधारली होती. मात्र, नंतर हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे ब्रेन डेड झाले आणि आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी बालिकाश्रम रस्त्यावरील रेडिओ नगर येथे काही वेळ ठेवण्यात आला होता. त्यानंतर सायंकाळी शोकाकूल वातावरणात अमरधाममध्ये अंत्यविधी करण्यात आला.

नगरचा चालताबोलता इतिहास
भूषण देशमुख हे मूळचे जामखेड येथील होते. टेक्सटाईल इंजिनिअरिंगचे शिक्षण त्यांनी घेतले होते. कापड निर्मिती कंपनीत काहीकाळ नोकरीही त्यांनी केली. मात्र, लिखाणाची आवड असल्याने त्यांनी ती नोकरी सोडून पत्रकारितेत प्रवेश केला. सुरुवातीला दैनिक केसरीमध्ये त्यांनी उपसंपादक म्हणून काम केले. त्यानंतर दैनिक लोकसत्ता व दैनिक दिव्य मराठी या दैनिकांतूनही त्यांनी विविध संपादकीय जबाबदार्‍या सांभाळल्या. याच दरम्यान, शहराच्या व जिल्ह्याच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांनी रुची घेतली. पुढे पत्रकारितेतून निवृत्त झाल्यावर इतिहास अभ्यासाची ही गोडी त्यांचे जीवनध्येय झाले.

हे सुद्धा वाचा :  दुष्काळ आता भूतकाळ होणार; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले पहा

निजामी इतिहासाचे गाढे अभ्यासक म्हणून ते राज्यात प्रसिद्ध होते. नगरच्या इतिहासाची ओळख करून देणारा हेरिटेज वॉक हा उपक्रम गेली अनेक वर्षे ते उत्साहाने चालवत होते. याअंतर्गत नगर शहर व जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांवर मुलांच्या व इतिहास प्रेमींच्या सहली नेऊन त्यांना शहराच्या समृद्ध इतिहासाची माहिती ते देत असत. अहिल्यानगर महापालिकेने त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. शहराच्या पर्यटनावर व इतिहासावर त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. स्नेहालयाच्या 90.4 एफएम रेडिओचे ते अनेक वर्ष संचालक होते. या रेडिओच्या माध्यमातून त्यांनी अनेक इतिहास व शिक्षण तज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या. अहिल्यानगरच्या मातीचा, संस्कृतीचा आणि गौरवशाली इतिहासाचा सखोल अभ्यास भूषण देशमुख यांचा होता. ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास, स्थानिक इतिहासाविषयीची तळमळ आणि पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी त्यांची नाळ जोडलेली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, इतिहास संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.

Follow us:

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Follow us on

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ

आमच्याविषयी

राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला. सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणारी पत्रकारीता करीत असताना रोखठोक आणि आक्रमक पत्रकारीता ही ‘नगर सह्याद्री’ची ओळख! ‘नगर सह्याद्री’ वाचला जातो तो वेगळ्या वैचारिक लिखाणासाठी! आम्ही परखड विचारांचा ‘सारिपाट’ मांडतो त्यासाठीच! लाळघोटणारी पत्रकारीता ‘नगर सह्याद्री’च्या टीमने कधी केली नाही आणि करणार पण नाही!

अहिल्यानगर कार्यालय

कुंदन नगरी अपार्टमेंट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, माळीवाडा अहमदनगर महाराष्ट्र ४१४००१

© 2026 Nagarsahyadri.com