- जाहिरात -spot_img
breaking news

कल्याण-अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्गासाठी संघर्ष उभारणार : माळशेज रेल्वे कृती समितीचा इशारा

1996 पासून पाठपुरावा सुरूच

पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कल्याण-अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग मंजूर करून प्रत्यक्षात आणण्यासाठी पुन्हा व्यापक संघर्ष उभारला जाणार असल्याची घोषणा माळशेज रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

पत्रकार परिषदेस माळशेज रेल्वे कृती समिती अध्यक्ष दिनेशचंद्र हुलावळे, उपाध्यक्ष मुरलीधर गुंजाळ, विलासराव आरोटे, सुरेश खामकर, माजी नगरसेवक मिलिंद गंधे,उपाध्यक्ष दादा भालेकर, माळशेज रेल्वे कृती समिती सदस्य उपस्थित होते. हुलावळे म्हणाले की, सन 1996 पासून माळशेज रेल्वे कृती समिती या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. या काळात निर्धार मेळावे, रेल्वे परिषदा, जनजागरण यात्रा, रेल्वे रथयात्रा, पाच लाख सह्यांची मोहीम, दिल्ली येथे निवेदने व पाठपुरावा अशा विविध लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे सन 2006 मध्ये या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले, तर सन 2019 मध्ये कल्याण ते मुरबाड या पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली.

आता हा प्रकल्प अधिक वेगाने पुढे न्यायचा असून, मुरबाड ते मढ-शिवनेरीपर्यंतचा टप्पा तातडीने मंजूर करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हा टप्पा पूर्ण झाल्यास मुरबाड-शिवनेरी परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि मुंबई महानगर क्षेत्राच्या विस्ताराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई-लातूर एक्सप्रेसवे व जनकल्याण महामार्गाच्या समांतर कल्याण-मुरबाड-माळशेज घाट-शिवनेरी-वासुंदे मार्गे अहिल्यानगरपर्यंत रेल्वेमार्गाला मंजुरी देऊन राज्यातील महत्त्वाचे रेल्वे जाळे पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

हा रेल्वेमार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि परळीसह मराठवाडा व आदिवासी भागासाठी विकासाची नवी संधी निर्माण करणारा ठरेल. तसेच हा मार्ग पूर्ण झाल्यास मुंबई ते विशाखापट्टणम या पश्चिम व पूर्व किनारपट्टीला जोडणारा देशातील महत्त्वाचा रेल्वे दुवा निर्माण होईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे प्रदेश मुंबईशी कमी अंतराच्या रेल्वेमार्गाने जोडले जातील.
या रेल्वेमार्गामुळे बीड, परळी, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून भाजीपाला, फळे, ऊस, साखर व इतर कृषी उत्पादने कमी वेळेत मुंबई बाजारपेठेत पोहोचविणे शक्य होईल. तसेच निर्यातीला चालना मिळून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

हे सुद्धा वाचा :  जमिनीच्या वादातून अंगणवाडी मदतनीसाला बेदम मारहाण!, काय घडलं पहा..

याशिवाय अकोले, संगमनेर आणि दक्षिण डोंगराळ भागाच्या विकासाला गती मिळेल. माळशेज घाट, शिवनेरी, लेण्याद्री, भीमाशंकर आदी पर्यटनस्थळांपर्यंत रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्याने पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळेल व स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. भविष्यात या रेल्वेमार्गासाठी बीड ते परळीपर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि युवकांना एकत्र करून राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचेही दिनेशचंद्र हुलावळे यांनी स्पष्ट केले.

या रेल्वेमार्गासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, अण्णा हजारे यांचे आशीर्वाद लाभले. खासदार सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, खा. भाऊसाहेब वाकचौरे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मान्यवरानी माळशिरस रेल्वे कृती समितीला कायम सक्रिय साथ दिली.भविष्यात जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वे मंत्री यांना भेटणार आहे.

मराठवाड्याच्या विकासाला नवसंजीवनी..
कल्याण-अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वेमार्ग हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून मराठवाड्याच्या विकासाची नवसंजीवनी आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास शेतकरी, उद्योग, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना मिळेल. राज्याच्या संतुलित विकासासाठी हा रेल्वे प्रकल्प तातडीने मंजूर करून प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही व्यापक लोकआंदोलन उभारणार असल्याचा इशारा माळशेज रेल्वे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ