सावेडी परिसरात भरदिवसा धावत्या दुचाकीवरून महिलेचे ५५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास; तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील सावेडी भागातील सिद्धिविनायक कॉलनी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका स्पीड ब्रेकर जवळ भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने रस्त्याने जात असलेल्या एका ४२ वर्षीय महिला नोकरदाराच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून चोरून नेले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.Z
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना गुरुवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास भिडे हॉस्पिटल चौकाजवळ घडली. पीडित महिला सावेडी परिसरातील रहिवासी असून, त्या आपल्या खाजगी नोकरीवरून घरी परतत असताना हा प्रकार घडला. दुचाकीवर आलेल्या एका अज्ञात आरोपीने गाडीचा वेग वाढवून महिलेच्या अगदी जवळून जात गळ्यातील ५५ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जोराने ओढून तोडले आणि काही सेकंदातच तेथून पळ काढला.
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिला प्रचंड घाबरली होती. त्यांनी तात्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत जबरदस्तीने चोरी करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कर्मचारी करत आहेत. पोलीस परिसरातील टेहळणी कॅमेऱ्यांच्या (सीसीटीव्ही) माध्यमातून अज्ञात आरोपीचा माग काढत आहेत.
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील केडगाव परिसरातील शाहूनगर भागात गटाराचे चेंबर साफ केल्यानंतर निघालेल्या कचऱ्यावरून दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका वाढला की, एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्यांच्या घरात घुसून महिलांसह वृद्ध सासऱ्यांना लाथाबुक्क्यांनी आणि झाडूने बेदम मारहाण केली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहूनगर येथील मुळे कॉलनी भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांच्या घरासमोरील तुंबलेले गटाराचे चेंबर दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडे मागणी केली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी महानगरपालिकेचे कर्मचारी आले आणि त्यांनी चेंबरमधील कचरा साफ करून तो शेजारीच काढून ठेवला. हा कचरा शेजारी राहणाऱ्या कल्पना भास्कर ठोकळ यांच्या घरासमोर पडल्याने त्यांना प्रचंड राग आला. त्यांनी घरातून बाहेर येत शेजाऱ्यांना मोठ्याने ओरडत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी पीडित महिलेने त्यांना शिवीगाळ करण्याचे कारण विचारले. याचा राग आल्याने कल्पना ठोकळ आणि त्यांचा मुलगा तन्मय भास्कर ठोकळ हे दोघेही थेट पीडित महिलेच्या घरात घुसले. कल्पना हिने महिलेची गचंडी पकडून, केस ओढत पाठीवर व तोंडावर बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या पीडित महिलेच्या जावेलाही तन्मय ठोकळ याने मारहाण करत बाजूला ढकलून दिले.
घरातील आरडाओरडा ऐकून पीडित महिलेचे वृद्ध सासरे भांडण मिटवण्यासाठी पुढे आले असता तन्मय याने हातातील झाडूने वृद्ध सासऱ्यांच्या पाठीवर आणि हातावर बेदम मारहाण करून त्यांना जखमी केले. हा प्रकार पाहून शेजारी राहणाऱ्या इतर महिलांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. जखमींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी कल्पना ठोकळ आणि तन्मय ठोकळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
खातगाव टाकळीत दागिने लंपास
अहिल्यानगर : तालुक्यातील खातगाव टाकळी येथे एका बंद घराचे कुलूप तोडूनचोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथे राहणारे प्रविण सुर्यभान कुलट यांचे खातगाव टाकळी येथे मूळ घर आहे. 29 जून ते 8 जुलै दरम्यान त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडले. चोरट्याने घरात प्रवेश करून 30 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम सोन्याची अंगठी आणि 50 हजार रुपये किमतीचे 1 तोळ्याचे मणी मंगळसूत्र, असा एकूण 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. प्रविण कुलट हे गावी परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आ
जाब विचारल्याने तरुणाला बेदम मारहाण
अहिल्यानगर : नातेवाईक महिलेला विनाकारण त्रास देणाऱ्या शेजाऱ्याला समजावून सांगायला गेलेल्या एका तरुणाला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी आणि चापटीने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मण मोहन रासकर (वय 30 वर्षे, रा. मांडवगण, श्रीगोंदा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी लक्ष्मण रासकर यांच्या नातेवाईक महिलेला सायकल लावण्याच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या कमलेश एनगंदुल याने शिवीगाळ व दमदाटी केली होती. सततच्या त्रासामुळे वाद मिटवण्यासाठी फिर्यादी तेथे गेले होते. त्यांनी कमलेश एनगंदुल याला बोलावून नातेवाईक महिलेला त्रास न देण्याबाबत समजावून सांगितले आणि पोलिसांत तक्रार करण्याची तंबी दिली. या गोष्टीचा राग मनात धरून आरोपी कमलेश एनगंदुल याने त्याच्या दोन मेव्हण्यांना, चुलत भावाला, मित्र खरमाळे आणि इतर दोन-तीन साथीदारांना बोलावून घेतले. या सर्वांनी मिळून फिर्यादीला बेदम मारहाण केली.










