अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ व समाजसेवक डॉ. सुभाष किसनराव म्हस्के (वय ८०) यांचे बुधवार, दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रासह सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
डॉ. म्हस्के हे सावेडी रोडवरील प्रसिद्ध म्हस्के अॅक्सिडेंट हॉस्पिटलचे प्रमुख होते. तसेच कै. काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशन आणि काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलाचे संस्थापक कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी गरजू रुग्णांना सेवा देत वैद्यकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार, ०१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता नालेगाव अमरधाम, अहिल्यानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परिवार आहे. डॉ. म्हस्के यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.










