अहिल्यानगरमध्ये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील गणेशवाडी भागात राहणार्या एका व्यापार्याला जादा नफ्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाख ६० हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीयुष संजय शिगवी यांना आरोपी सतिष सिद्रप्पा कोरी, अर्थत अशोक कोरी (दोघे रा. पुणे), संमेध सुभाष बसवड (रा. डोंबिवली) आणि प्रकाश सरजू लंडन (रा. छत्तीसगड) यांनी संगनमत करून व्यवसायात मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. आरोपींनी विविध बनावट कागदपत्रे तयार करून शिगवी यांचा विश्वास संपादन केला. या विश्वासाचा फायदा घेत आरोपींनी त्यांच्याकडून १ कोटी ७ लाख रुपये किमतीचा तांदूळ घेतला. इतकेच नव्हे तर, हा माल पोहोचवण्यासाठी आणखी ४ लाख ६० हजार रुपये ऑनलाइन स्वरूपात उकळले.
माल घेऊनही त्याचे पैसे न देता आणि दिलेली आश्वासने न पाळता आरोपींनी शिगवी यांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिगवी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश देशमुख आणि पोलीस हवालदार गाजरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. व्यापार्यांमध्ये या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे खळबळ उडाली आहे.
तरुणावर कोयत्याने हल्ला करून अपहरण
अहिल्यानगर ः एमआयडीसी भागातील क्रॉम्प्टन कंपनीसमोर भरदुपारी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करून त्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अक्षय दत्तात्रय गवळी (वय २९, रा. नवनागापूर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रवीण ज्ञानदेव मोरे हा तरुण राजामाणूस एंटरप्राइजेस जवळ असताना, आरोपी संजय ठोंबरे (रा. आदर्शनगर), सत्यम कासार, आलोक चारोडे (दोघे रा. अस्तगाव, ता. पारनेर) आणि एका अनोळखी इसमाने संगनमत करून त्याच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रवीणला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताब्यातील चारचाकी गाडीने (एमएच १६ डीसी ६६९१) जोराची धडक दिली.या अपघातानंतर आरोपींनी प्रवीणवर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीणला आरोपींनी जबरदस्तीने गाडीत टाकून पळवून नेले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठाला मारहाण
अहिल्यानगर: नागापूर परिसरातील कृष्णाई निवास भागात राहणार्या एका ६० वर्षीय ज्येष्ठाला आणि त्यांच्या कुटुंबाला जुन्या वादाच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका तरुणासह दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमेश नाथाजी आणि त्यांचे कुटुंबीय घरात असताना आरोपी रूपाली विकी जगधने, दिपाली कांबळे आणि आकाश कांबळे तिथे आले. यावेळी रूपाली जगधने हिने फिर्यादीच्या मुलीमुळे संसार मोडल्याचा आरोप करत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याच दरम्यान आकाश कांबळे याने आपल्या हातातील लाकडी काठीने रमेश नाथाजी यांच्या कपाळावर जोरात प्रहार करून त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आणि मुलालाही आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
विवाहितेचा छळ
अहिल्यानगर: घर बांधण्यासाठी माहेरून १० लाख रुपये घेऊन ये, तरच तुला नांदवू, अशी अट घालत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विवाहिता आपल्या सासरी नांदत असताना आरोपींनी संगनमत करून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तुझ्या माहेराहून आपल्याला घर बांधायचे आहे, त्यासाठी १० लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपींनी वारंवार लावून धरली. ही मागणी पूर्ण होत नसल्याने विवाहितेची उपासमार करण्यात आली. तसेच तिला वेळोवेळी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.आरोपींनी विवाहितेला घराबाहेर हाकलून दिल्याने अखेर तिने पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली. पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल येथे या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर, दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी पती शुभम ठुबे, ललिता ठुबे, दीपक ठुबे, शुभांगी पवार आणि सोनाली काळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत.










