15 हजार रुपये दंड वसूल
राहुरी | नगर सह्याद्री
प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राहुरी शहरातील दुकानदारांवर मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी धडक कारवाई करत 15 हजार रुपये दंड वसूल करून 71 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे.
शुक्रवार 17 जुलैला दुपारी 4 वाजता मुख्याधिकारी हराळे यांनी नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या पथकासमवेत ही कारवाई केली. केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचना तसेच सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमा नुसार सिंगल युज प्लास्टिकच्या उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून आज शहरात धडक मोहीम राबवुन शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिकचा वापर आणि साठा करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा उगारण्यात आला. या मोहिमेत नगरपरिषदेच्या वसुली आणि आरोग्य विभागातील संतोष डागवाले, बाळासाहेब पवार, गणेश यादव, सोमनाथ गायकवाड, बाळासाहेब कचरे, अनिल जाधव आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. पर्यावरणाचे रक्षण तसेच राहुरी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्लास्टिक बंदी कायद्याचे सर्वांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. यापुढेही ही धडक मोहीम अधिक तीव्र केली जाईल, व्यापा-यांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवून प्रशासनाला सहकार्य करावे.
-भाऊसाहेब मोरे (नगराध्यक्ष),
-गजानन सातभाई (उपनगराध्यक्ष)










