- जाहिरात -spot_img
breaking news

पंतप्रधान पद भूषवण्याचा मोदींनी विश्वविक्रम मोडला; मंत्री विखे पाटील, सर्वच क्षेत्रांमध्ये जिल्हा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ वर्षाचा सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवण्याचा विश्वविक्रम मोडला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टी देशात २२ राज्यांमध्ये सत्ता असलेला सर्वात मोठा पक्ष झाला आहे. स्वातंत्र्यानंतर एवढी मोठी उपलब्धी कोणत्याही पक्षाला मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व यश पक्षाला मिळाले आहे. राष्ट्र प्रथम हे एकमेव धोरण घेऊन त्यांनी नव्या आत्मविश्वासाने देशाला विकासाकडे नेले. त्याचबरोबर जगाच्या महासत्तेकडे देशाची वाटचाल सुरू आहे. सबका साथ सबका विकास ही संकल्पना प्रत्यक्षात आणून सर्वसामान्यांसाठी अनेक लाभदायी योजना सुरू करून प्रभावी अंमलबजावणी पूर्ण भारतात होत आहे. त्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला सामावून घेतले आहे. २०४७ सालचा जगातील विकसित भारताची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या माध्यमातून केली आहे. कृषी सह सर्वच क्षेत्रांमध्ये देश स्वयंपूर्ण होत असून शेतमालाला सर्वाधिक भाव दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून काम करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या बारा वर्षात बहुमोल योगदान दिले आहे. त्यामुळेच भविष्यात भारत आत्मनिर्भय, समृद्ध, अर्थ क्षेत्रात सक्षम असा देश होऊन जगाचे नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार आहे. देशाच्या या विकासात अहिल्यानगरलाही मोठ्या प्रमाणात विकासाची संधी मिळाली असून रस्ते, रेल्वे, औद्योगिक क्षेत्र, विमानसेवा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये नगर जिल्हा विकसित होत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मागील १२ वर्षांत झालेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची विकासाची माहिती दिली. यावेळी भाजपाचे प्रदेश कार्यकारी सदस्य विश्वनाथ कोरडे, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस महेश नामदे, उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक निखिल वारे व महेश लोंढे, मुकुळ गंधे, विनायक देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष ऋद्रेश अंबाडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा :  सैनिक बँक घोटाळा प्रकरणातील आरोपींना पुन्हा दणका....

अधिक माहिती देताना मंत्री विखे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम व दूरदर्शी नेतृत्वामुळे देशातील सामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. २५ कोटी लोक प्रत्यक्षात गरिबीच्या बाहेर आले असून, देशातील ८१ कोटी लोकांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले असून, ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून ४.२७ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून १०.२ लाख कोटी रुपयांचे वितरण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील १२ कोटी कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असून, ५ लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांचा यामध्ये समावेश आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, प्रधानमंत्री आवास योजनेतून आतापर्यंत ४ कोटी कुटुंबांना घरांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने नेहमीच महिलांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य दिले आहे. आजपर्यंत ३ कोटी महिला ‘लखपती दीदी’ देशामध्ये निर्माण झाल्या आहेत. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ कोटी लखपती दीदी बनविण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

मागील १२ वर्षांच्या कार्यकाळात देशातील अन्नधान्याच्या उत्पादनात ७० टक्के ही ऐतिहासिक वाढ झाली असून, अन्नदाता सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहेत. दूध उत्पादनातही मागील १० वर्षांत ६९.४ टक्के वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार ‘प्रत्येक थेंबातून अधिक पीक’ यासाठी १०९ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यात आले असून, पाण्याच्या बचतीबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. देशात आणि राज्यात नदीजोड प्रकल्पांना दिलेले प्राधान्य आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून अपूर्ण कामांना मिळालेली गती याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

देशात १.४६ लाख कि.मी. पर्यंतच्या महामार्गांची कामे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि देशातील १,३३७ रेल्वे स्थानकांना आधुनिक दर्जा मिळवून देण्यासाठी काम सुरू झाले आहे. १६४ हून अधिक वंदे भारत ट्रेन सध्या नागरिकांना सुविधा देत आहेत. देशामध्ये डिजिटल क्रांतीची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झाली असून, यामुळे सामान्य माणसाच्या राहणीमानातील सुलभता वाढून जीवन अधिक सुकर झाले आहे. ६ कोटींहून अधिक लोक डिजिटल साक्षर झाले असून, युपीआय (UPI) व्यवहारांमध्ये १२ हजार पटींची वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटच्या बाबतीत भारत देश आज जगात आघाडीवर आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा :  महामार्ग दिशादर्शक फलकावरील जुनी नावे तात्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उत्पादन क्षेत्राला मोठे पाठबळ मिळाले असून, भारत देश आता सेमीकंडक्टर उत्पादनाचे जागतिक केंद्र बनला आहे. मोबाईल निर्मितीमध्येही भारत दुसऱ्या स्थानी आला आहे. संरक्षण उत्पादनांमध्ये देशाने मोठी प्रगती केली असून, या उत्पादनांचा निर्यातदार म्हणून आता भारत देशाची ओळख झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातही संरक्षण उत्पादनाचा कार्यान्वित झालेला प्रकल्प हा स्टार्टअपला मिळालेल्या पाठबळाचे यश असल्याचे सांगून, देशातील स्टार्टअपची संख्या आता २.२३ लाखांच्या पुढे गेली आहे. वारसा आणि विकास यांची सांगड घालून मागील १२ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी १,७०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर, काशी विश्वनाथ कॉरिडॉर आणि उज्जैनचे महाकाल लोक यांद्वारे केंद्र सरकारने लाखो भारतीयांच्या श्रद्धेचा सन्मान केला असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ