भंडारदरा धरण 75 टक्के तर निळवंडे धरण 38 टक्के भरले
विलास तुपे | नगर सह्याद्री
राजूर ः उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरणात पाण्याची आवक वाढत आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात व परिसरात गत चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पावसाचे तांडव सुरू आहे. सतत पडत असलेल्या पावसाने आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आदिवासी बांधवांवर आपली पाळीव जनावरे घरातच बांधण्याची वेळ आली आहे. पावसामुळे हवेत गारठा तयार झाला असुन घराघरांमध्ये शेकोट्या पेटल्या आहेत. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे काळ्या कातळावरुन पांढऱ्या शुभ्र पाण्याचे धबधबे कोसळत आहेत. ओढे-नाले दुथडी भरून वाहते झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात यावष पाऊस उशिरा दाखल झाल्याने परिसरातील शेतकरी वर्गाच्या पोटात चिंतेचा गोळा आला होता. दुबार पेरणीचे संकट उभे राहीले होते; पंरतु पाऊस उशीरा का होईना दाखल झाल्यानंतर भात लागवडी योग्य पाऊस पडत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गत 24 तासात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा येथे 129 मिमी पावसाची नोंद झाली असून घाटघर येथे 185मिमी पाऊस पडला. तर पांजरे 160 मी मी. रतनवाडी येथे 174 मिमी, वाकी येथे 122 मिमी पाऊस नोंदविला गेला. धरणाचा पाणीसाठा 8124 दशलक्ष घनफुटावर पोहचल्याने भंडारदरा धरण 73.59 टक्के भरले आहे. असाच पाऊस चालू राहिला तर लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे.
हरिश्चंद्रगड, रतनगड, सांदणदरी परिसरात पर्यटकांना प्रवेश बंदी
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाचा निर्णय
राजूर | नगर सह्याद्री
राजूर अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगड आणि साम्रद येथील सांदण दरी ही प्रसिद्ध पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद करण्यात आली आहेत. नुकतेच हरिश्चंद्रगडावर दरड कोसळून चार पर्यटकांचा पर्यटक जखमी झाले होते. नाशिक वन्यजीव विभागाने पावसाळ्यात वाढलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

सध्या भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असून, निसर्गाने देखणे रूप धारण केले आहे. धबधबे, ओढे-नाले भरून वाहू लागले आहेत तर रस्ते धुक्याने झाकले जात आहेत. यामुळे प्रचंड गारवा जाणवत आहे. विशेषतः आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची सांदणदरी पावसाळ्यात अधिकच धोकादायक ठरते. येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी व चेरापुंजीसारख्या पावसाचा आनंद घेण्यासाठी केवळ जिल्ह्यातूनच नव्हे तर शेजारील नाशिक, पुणे, मुंबई या परिसरातून दर वष हजारो पर्यटक भेट देतात. मात्र मागील दोन वष धुक्यामुळे बाट चुकून एक पर्यटक मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर या परिसरात या कालवाधीत अनेक छोट्या-मोठ्या घटना, दुर्घटना घडत असतात. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने कठोर पावले उचलली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे व बंदी असलेली ठिकाणे टाळावीत, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर पर्यटकांवर कारवाई
अति पावसामुळे या धोकादायक स्थळांवर प्रवेशास बंदी घालण्यात आली असून, पर्यटकांनी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा वनविभागाच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच स्थानिक गार्डमार्फत सतत सूचना दिल्या जात आहेत. फलकही लावण्यात आले आहेत. ही माहिती कळसूबाई – भंडारदरा-हरिश्चंद्रगड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल रुपेश गावित आणि प्रतिभा सोनवणे यांनी दिली आहे.










