नोकरीचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार / अभिषेक कळमकरवर अत्याचाराचा दुसरा गुन्हा
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका २७ वर्षीय युवतीवर कारमध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून माजी महापौर अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीडित युवतीची ओळख अभिषेक कळमकर याच्याशी झाली होती. युवतीने ती बेरोजगार असल्याचे सांगितल्यावर कळमकर याने तिला नोकरीसाठी मदत करण्याचे आश्वासन देत तिचा भ्रमणध्वनी क्रमांक घेतला होता. त्यानंतर जुलै २०२४ मध्ये त्याने युवतीला संपर्क साधून शोरूममध्ये काम देण्याच्या बहाण्याने बेलेश्वर मंदिर परिसरातील पाथर्डी रस्त्यावर बोलावून घेतले.
पीडिता तिथे पोहोचल्यानंतर कळमकर याने तिला स्वतःच्या कारमध्ये बसवले. नगर लबच्या पुढे निर्जन ठिकाणी कार उभी करून त्याने तिला पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली. पाणी पिल्यानंतर पीडितेला भुरळ आली. आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध कारमध्येच अत्याचार केला. या कृत्यानंतर त्याने पीडितेला धमकावून सोडून दिले.काही दिवसांनी आरोपीने पुन्हा संपर्क साधून पीडितेकडे भेटीची मागणी केली. तिने नकार दिला असता, त्याने कारमधील घटनेचे छायाचित्र आणि चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच, भेटायला न आल्यास जीवे मारण्याचीही भीती घातली. सामाजिक दबावामुळे आणि भीतीपोटी पीडितेने इतके दिवस मौन पाळले होते. मात्र, आरोपीवर इतरही गुन्हे दाखल झाल्याचे समजताच पीडितेने हिंमत करून पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.










