- जाहिरात -spot_img
breaking news

पिके जळू लागल्याने पारनेरमध्ये शेतकरी आक्रमक, वीज केंद्रावर शेतकऱ्यांनी केले असे…

खडकवाडी वीज केंद्रावर शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; भारनियमनाच्या जाचातून मुक्त करण्याची मागणी
पारनेर / नगर सह्याद्री –
तालुक्यातील पळशी, वनकुटे आणि खडकवाडी परिसरात विजेचा लपंडाव आणि कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या समस्येविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी खडकवाडी येथील वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागात वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नसल्याने आणि लोडशेडिंगचे प्रमाण अनपेक्षितपणे वाढल्याने उभी पिके डोळ्यादेखत जळू लागली आहेत. विशेषतः लागवड केलेला कांदा, टोमॅटो आणि इतर नगदी पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे, ज्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्गाने आक्रमक पवित्रा घेतला.

​या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन रांधवण आणि पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड यांनी केले. या परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास असून त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून आहे. मात्र, खडकवाडी वीज केंद्राकडून मिळणाऱ्या अनियमित पुरवठ्यामुळे या कष्टकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले. यावेळी डॉ. नितीन रांधवण, प्रकाश राठोड यांच्यासह बाळासाहेब मुसळे, आप्पासाहेब गागरे, दिपक खामकर, ज्ञानेश्वर गागरे, पवन खामकर, पोपट मेंगाळ, नारायण गागरे, रोहिदास देशमुख, वसंत मुसळे, भास्कर गागरे, अजित वाळुंज, सोमनाथ मुसळे, योगेश शिंदे, गोपीनाथ गुंजाळ, बाबाजी वाबळे, भीमराज मुसळे, विकास डुकरे, गोरख इरोळे आणि देविदास वाबळे यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

​वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आणि तांत्रिक त्रुटी दूर करण्याचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले असून, जर त्वरित सुधारणा झाली नाही तर आगामी काळात अधिक तीव्र लढा उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :  बेकायदेशीर जाहिरातबाजी भोवली; महापालिकेने काय केले पहा

विजेचा प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करू
पळशी-वनकुटे परिसरातील बहुतांश आदिवासी समाज शेतीवर अवलंबून आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि कमी दाबाची समस्या यामुळे पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. कष्टाने उभी केलेली पिके डोळ्यादेखत जळताना पाहणे वेदनादायक आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृती करून वीज समस्या सोडवावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आम्ही वीज केंद्रावर कायमस्वरूपी ठिय्या मांडू. असे मत पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड व वनकुटे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. नितीन रांधवन यांनी व्यक्त केले आहे.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ