प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रवाशांमधून तीव्र संताप
पारनेर | नगर सह्याद्री
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पारनेर बसस्थानक हे संपूर्ण तालुक्याचे मुख्य केंद्र आहे. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी, शिक्षणासाठी आणि उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची, तसेच विद्यार्थ्यांची येथे दिवसभर मोठी गद असते. मात्र, सध्या या गजबजलेल्या बसस्थानकावर प्रवाशांना, विशेषतः महिलांना, मूलभूत सुविधांसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथील शौचालयाच्या दुरवस्थेमुळे महिला प्रवाशांची मोठी कुचंबणा होत असून, प्रशासनाचा कारभार रामभरोसे चालला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
सध्या पारनेर बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पत्राच्या शेडचे शौचालय उभारले आहे. परंतु, हे नियोजन करताना प्रशासनाने अक्षम्य निष्काळजीपणा दाखवला आहे. हे तात्पुरते शौचालय अत्यंत आडबाजूला उभारण्यात आले असल्याने ते सहजासहजी कोणाच्याही नजरेस पडत नाही. योग्य फलक किंवा दिशादर्शक नसल्याने नवीन प्रवाशांना तर शौचालय शोधतानाच मोठी कसरत करावी लागते.
यातच भर म्हणून, अनेक पुरुष प्रवासी या मुख्य तात्पुरत्या शौचालयाचा वापर न करता, थेट रस्त्यालगतच आडबाजूला उघड्यावर लघुशंका करतात. पुरुष प्रवाशांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे आणि रस्त्यावरील अस्वच्छतेमुळे महिला प्रवाशांना त्या बाजूला जाणे अत्यंत लाजिरवाणे आणि त्रासदायक ठरत आहे. दुर्गंधी आणि तिथे असणारी पुरुषांची गद यामुळे महिलांना शौचालयाकडे जाण्यासाठी मानसिक कुचंबणा सहन करावी लागत आहे.
पारनेर बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम पूर्ण होण्यासाठी अजून बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या भागात दुर्गंधी वाढून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आता या समस्येकडे परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष देऊन तात्काळ कारवाई करणार की प्रवाशांना अशीच दुरवस्था सहन करावी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शौचालयाची दुरवस्था महिलासाठी त्रासदायक
पारनेर बसस्थानकावरील तात्पुरत्या शौचालयाची दुरवस्था महिला प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक ठरत आहे. प्रशासनाने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे महिलांची मानसिक कुचंबणा होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने येथे आजार पसरण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने तात्काळ जागृत होऊन, सुरक्षित आणि सुलभ ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र, स्वच्छ शौचालयाची व्यवस्था करावी; अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन छेडावे लागेल.
-सुनिता पवार (महिला अध्यक्षा, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पारनेर)










