चेअरमन आणि सचिव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार
पारनेर | नगर सह्याद्री
तालुक्यातील करंदी सोसायटीच्या सभासदाने कोणत्याही प्रकारचा कर्ज अर्ज अथवा इकरारनामा केलेला नसताना त्यांच्या शेतजमिनीवर तब्बल 9 लाख 10 हजार रुपयांचा बोजा चढविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित सभासदाने सोसायटीचे चेअरमन आणि सचिव यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
करंदी येथील रहिवासी व सोसायटीचे सभासद पाटीलबा जबाजी ठाणगे यांनी ऑनलाइन तक्रारीद्वारे हा गंभीर प्रकार समोर आणला आहे. ठाणगे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सोसायटीकडे कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज केलेला नव्हता. तसेच कोणत्याही कर्ज व्यवहारासंदर्भात इकरारनामा अथवा संमतीही दिलेली नव्हती. मात्र, 16 जून रोजी त्यांच्या करंदी येथील गट क्रमांक 516 व 620 या शेतजमिनीवर फेरफार क्रमांक 4859 अन्वये 9 लाख 10 हजार रुपयांचा बोजा नोंदवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकाराची माहिती मिळताच ठाणगे यांनी महसूल विभागाकडे धाव घेत संबंधित कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी समोर आलेल्या माहितीमुळे त्यांना मोठा धक्का बसला. तक्रारीनुसार, कर्ज मंजुरीसाठी आवश्यक असलेला इकरार फॉर्म स्वतः सभासदाने भरलेला नसताना तो सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीचे चेअरमन प्रकाश कोंडीबा ठाणगे आणि सचिव अविनाश बबन जोशी यांनी संबंधित सभासदाच्या परवानगीशिवाय इकरार फॉर्म तयार केला. त्यावर दोन साक्षीदारांची नावे नमूद करण्यात आली. तसेच सभासदाच्या कथित बनावट सह्या करून पीडीई युजर लॉगिनच्या माध्यमातून ऑनलाइन माहिती अद्ययावत करण्यात आली. त्यानंतर फेरफार क्रमांक 4859 तयार होऊन संबंधित जमिनीवर कर्जाचा बोजा नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणात अधिकारांचा गैरवापर करून संगनमताने फसवणूक करण्यात आल्याचा आरोप ठाणगे यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकारामुळे केवळ संबंधित सभासदालाच आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला असून सोसायटीच्या कामकाजाच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. या प्रकरणाची दखल घेत पारनेर पोलिस काय भूमिका घेतात आणि चौकशीत नेमके कोणते तथ्य समोर येतात, याकडे करंदीसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.










