भिंगार येथे विराट हिंदू संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भारताची १९४७ साली फाळणी होईल असे कोणालाही वाटले नव्हते. तरी पाकिस्तान हा धर्माच्या नावाखाली वेगळा झालाच. नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, इराक, इराण यांचे आज जरी काही वेगळे चालले असले तरी ईश्वराच्या, विधी व नियतीनुसार २०४७ साली अखंड भारत निर्माण होईल. अशी वाटचाल भारत देशात सुरू आहे. शंभर वर्षाच्या संघ वाटचालीमुळे भारत मातेला परमोच्च वैभव प्राप्त होऊन भारत हा विश्वगुरू होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय बजरंग दलाचे सहसंयोजक विवेक कुलकर्णी यांनी केले.
भिंगार येथील श्री शुलेश्वर महादेव मंदिर येथे विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त भिंगार येथील प्राचीन मारुती मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत या मिरवणुकीत हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. या शोभायात्रेचा समारोप श्री शुलेश्वर महादेव मंदिर येथे करण्यात आला. यानंतर विराट हिंदू संमेलनाचे प्रखर हिंदुत्ववादी वक्ते बजरंग दलाचे अखिल भारतीय सहसंयोजक विवेक कुलकर्णी, मेहेकरी येथील संजीवनी गडाचे महंत शंकर भारती महाराज, आळंदी येथील युवा प्रवचनकार हभप महादेव महाराज घोडके, पुणे येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते सर्वेश मेहंदळे आदींनी सभेला उद्बोधन केले. याप्रसंगी हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
हिंदू संस्कृती व परंपरेवर हजारो वर्षांपासून आक्रमणे झाली तरी देखील हिंदू संस्कृती टिकली आहे. हिंदूंचा स्वाभिमान व शक्ती जागृत करण्यासाठी १९२५ साली पूजनीय डॉ. केशव हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाचे संघटन कार्य पाहून जग म्हणते आम्हाला आत्मभावनेने संघटित व्हायचे असेल, तर संघासारखे संघटन कौशल्य आम्हाला हवे आहे, असे श्री. कुलकर्णी म्हणाले.
विश्व पटलावर हिंदूंच्या समस्या कोण मांडेल?विश्वामध्ये हिंदूंना एकत्र कोण करेल? वनवासी समाजाच्या समस्या, हिंदू माता भगिनींच्या समस्या कोण मांडणार? सर्व हिंदू समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी साधुसंतांना एकत्र करून संतांच्या आदेशानुसार विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली.तसेच कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी भारतीय मजदूर संघाची स्थापना करण्यात आली. संघाची १०० वर्षाची वाटचाल काय आहे? हे समजून घेण्यासाठी विराट हिंदू संमेलन देशभर होत आहेत, अशी माहिती विवेक कुलकर्णी यांनी दिली.
युवा प्रवचनकार हभप महादेव महाराज घोडके म्हणाले, टिपू सुलतान व आलमगीर चे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न या देशात होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेतल हे सांगण्याचा आम्हाला गर्व वाटत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी केलेले बलिदान हिंदू समाज कदापि विसरणार नाही. वारकर्यांनी धर्मासाठी बोलले तर त्यांना लवांडे सारखे घुसखोर म्हणतात. ज्यांना वारकरी संप्रदाय कळालाच नाही, जे लोक एकादशीला मटन खातात.त्यांनी वारकर्यांना घुसखोर म्हणण्याची लायकीच नाही.
सर्वेश मेहंदळे म्हणाले,लव जिहाद व लँड जिहाद ही समस्या संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वफ बोर्डाने मढी देवस्थान ट्रस्टची २०० ते २५० एकर जमिनीवर दावा दाखल केला आहे. तसेच नाशिकच्या कार्पोरेट क्षेत्रात उच्चभ्रू ठिकाणी नोकरी करत असलेल्या महिलांना लव जिहादच्या जाळ्यात ओढले जाते. आता हिंदू समाजाने जागृत होणे गरजेचे आहे. लव जिहाद व लँड जिहाद थांबवायचा असेल तर यासाठी कायद्यात आवश्यकते बदल करणे आवश्यक आहे. विराट हिंदू संमेलनासाठी भिंगार, नागरदेवळे येथील हिंदू समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. संमेलनाचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला.










