अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, पुणे महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग पुलावरील तुटलेले कठडे, कल्याण रोडवरील नवीन पाणीटाकीचा प्रस्ताव, बोल्हेगावमधील रस्त्यांची अवस्था, आरोग्य अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आदी विषयांवर स्थायीच्या सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाहीची मागणी केली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती सुभाष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर, सदस्य निखिल वारे, मनोज दुल्लम, सुरेश बनसोडे, नवनाथ कातोरे, सोनाबाई शिंदे, गौरी बोरकर, सुनिता कुलकण आदी उपस्थित होते.सभापती सुभाष लोंढे यांनी कल्याण रोडवरील नवीन पाणीटाकीच्या प्रकल्प अहवालाबाबत विचारणा केली. यावर जलअभियंता गणेश गाडळकर यांनी, साधारण एक महिन्यात प्रकल्प अहवाल तयार होईल. यापूवच्या डीपीआरमधील माहितीचा उपयोग करण्यात येईल, असे सांगितले.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी ठेकेदाराची नियुक्ती कधी होणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर अहवाल पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
यावेळी बाबासाहेब वाकळे यांनी, काम उशिरा करणाऱ्या ठेकेदारांवर दंड आकारला जातो, त्याचप्रमाणे मुदतीपूव काम पूर्ण करणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे, त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील, अशी सूचना केली.सभापती सुभाष लोंढे यांनी, कल्याण रोडवरील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी ही पाणीटाकी अत्यंत आवश्यक असून तिची सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करून प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करावे, असे निर्देश दिले.मनोज कोतकर यांनी पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हरब्रिजची दुरवस्था आणि तुटलेले कठडे याबाबत चिंता व्यक्त केली.
या पुलाखाली लोकवस्ती आहे. कठडे तुटलेले असल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवून चालणार नाही. महानगरपालिकेने तातडीने पत्रव्यवहार करून हा प्रश्न सोडवावा. आवश्यक असल्यास नवीन उड्डाणपुलासाठीही पाठपुरावा करावा.सदस्य निखिल वारे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. सतीश राजूरकर हे पूर्वसूचना न देता सभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. त्यांच्यावर नोटीस बजावून खुलासा मागवावा, अशी मागणी केली. नागरी प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.










