- जाहिरात -spot_img
breaking news

आर्द्रा बरसल्या, बळीराजा सुखावला; जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद

जिल्ह्यात 66.1 मिलीमिटर पाऊस | जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
जिल्ह्यात मान्सूनने अद्याप अपेक्षित वेग पकडलेला नसून 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालानुसार जिल्ह्यात सरासरी 66.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद जून महिन्याच्या सरासरी 104.6 मिमी पावसाच्या तुलनेत केवळ 63.2 टक्के इतकी आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली असून येथे 141.1 मिमी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या 143.2 टक्के इतका आहे. त्याखालोखाल श्रीगोंदा (87.4 मिमी), नेवासा (83.4 मिमी) आणि नगर (84.5 मिमी) तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे.

दुसरीकडे, राहुरी तालुक्यात केवळ 17.7 मिमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या फक्त 17.3 टक्के आहे. तसेच अकोले (23.1 मिमी), संगमनेर (27.4 मिमी), कोपरगाव (39.5 मिमी) आणि राहाता (33.5 मिमी) तालुक्यांमध्येही अत्यल्प पाऊस झाला आहे.जून ते सप्टेंबर या कालावधीतील सरासरी हंगामी पर्जन्यमानाच्या तुलनेत जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 14.8 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचे लक्ष आगामी पावसाकडे लागले आहे.

तालुकानिहाय रविवारचा पाऊस
नगर 19.2, पारनेर 12.9, श्रीगोंदा 19.4, कर्जत 11.1, जामखेड 2.2, शेवगाव 26.3, पाथड 16.2, नेवासा 13.8, राहुरी 11.2, संगमनेर 12.6, अकोले 11.6, कोपरगाव 14.9, श्रीरामपूर 37, राहता 11.4 मिलीमिटर पाऊस झाला. रविवारी जिल्ह्यात सरासरी 15 मिलीमिटर पाऊस झाला. दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; हवामान खात्याचा यलो अलर्ट जारी
राज्यभर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. यातच आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पुन्हा एकदा दमदार पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकणपट्टीत आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम किनारपट्टी, संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाटभागात 29 जून ते 2 जुलै या काळात पावसाचा जोर वाढेल. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे 1 आणि 2 जुलै या कालावधीत तळकोकण, गोवा तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढलेला असेल. मुंबईसह कोकण विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमधील 'त्या' घुसखोरांची एटीएस मार्फत चौकशी करा ; आमदार संग्राम जगताप काय म्हणाले पहा

जांभळी गावात जोरदार पाऊस; तलाव अर्धा भरला
खरवंडीकासार | नगर सह्याद्री
पाथड तालुक्यातील जांभळी गावच्या परिसरात रविवारी दुपारी निसर्गाचा मोठा प्रकोप पाहायला मिळाला. जांभळी गावात दीड तास झालेल्या मुसळधार पावसामुळे गाव जलमय झाले. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, काही वेळातच गाव जलमय झाले. मात्र, या संपूर्ण अस्मानी संकटात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रविवारी दुपारच्या सुमारास आकाशात अचानक काळ्या ढगांनी चादर पांघरली आणि पाहता पाहता ढगफुटीसारखा प्रचंड पाऊस सुरू झाला. अवघ्या काही मिनिटांत गावातील ओढे, नाले ओव्हरफ्लो झाले. शेतांना नद्यांचे स्वरूप आले. पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की भिलवडे-जांभळी रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला आहे.
विशेष म्हणजे जांभळीच्या परिसरातच हा पाऊस पडला. शेजारच्या गावात अजून ही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गावातच असणारा पिण्याचा पाण्याचा तलाव 50% भरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खते, बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओघ दिसत आहे.

राहुरी तालुक्यात जोरदार पर्जन्यवृष्टी; ऊस, घास पिकाला जीवदान
राहुरी | नगर सह्याद्री
राहुरी तालुक्यात रविवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावली. राहुरी शहरासह टाकळीमिया, देवळाली, वळण, मांजरी, मानोरी, ब्राह्मणी, केंद्रळ, उंबरे परिसरासह अनेक गावांत समाधानकारक पाऊस झाला. अनेक दिवसांपासून लांबलेल्या पावसाने खरीप हंगाम लांबलेला होता. रविवारी झालेल्या पावसाने खरीप हंगामासाठी शेतकरी मशागतीचा तयारीला लागले. कपाशी, मका तसेच अन्य पिकांसाठी हा पाऊस लाभदायक ठरणार आहे. ऊस, तूर, घास या पिकांना पावसामुळे नवसंजीवनी मिळाली. पावसामुळे उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला. जोरदार पावसाने शेतात पाणी साचले होते. पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. हवामान अनुकूल राहिल्यास आगामी काही दिवसांत खरीप पिकाच्या पेरण्या अधिक वेगाने पूर्ण होतील, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पावसाने शेतकऱ्यांना दिलासा
कोल्हार | नगर सह्याद्री
मृग नक्षत्राच्या पावसाने पाठ फिरवल्यानंतर शेतकरी हवालदिल झालेला असतानाच, गेल्या तीन दिवसापासून आर्द्रा नक्षत्रातील या पावसाने हजेरी लावल्याने शेतात कोमेजलेली पिके बहरली आहे. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द, रामपूर, सोनगाव, आंबी, चिंचोली, पिंपळगाव परिसरातील शेतकरी सुखावला आहे.

हे सुद्धा वाचा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य महोत्सवाचे आयोजन

मोसमी पावसाने सर्वदूर हुलकवणी दिली होती, त्यामुळे कपाशी, सोयाबीन, मठ, मूग अशा रब्बीच्या नगदी पिकांच्या पेरण्या काही भागात खोलंबल्या होत्या, तर राहुरी तालुक्याच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या देखील होत्या, मात्र मृग नक्षत्राच्या पावसाने दांडी मारली. त्यामुळे उन्हाचा चटका चांगलाच जाणवू लागला होता. शेतात उगवून आलेल्या पिकांनी माना टाकल्या होत्या. अनेक ठिकाणी दुबार पेरणीचे देखील संकट ओढवले होते. अशा आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला असतानाच गेल्या तीन दिवसांपासून राहुरी तालुक्याच्या उत्तर भागात आर्द्रा नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तीन दिवसांपासून कुठे दमदार तर कुठे रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे शेतात कोमेजून चाललेली पिके बहरली आहे. त्यामुळे शेतकरी देखील सुखवला असून, रब्बीच्या पिकांची कामे करण्यासाठी पुन्हा एकदा बळीराजाची पावले शेतीकडे वळली आहेत.

भोयरे गांगर्डा परिसरात पावसाची दमदार हजेरी, पहिल्याच पावसात केटीवेअर ओव्हरफ्लो
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा परिसरात रविवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उशीरा का होईना पेरणीयोग्य पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

चालूवष रोहिणी, पूर्वासह एकामागून एक नक्षत्र कोरडे जाऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. रविवारी सकाळी अकरानंतर आकाशात ढग भरून आले व तीन वाजता जोराचा पाऊस सुरू झाला. यादरम्यान भोयरे गांगर्डा, कडूस, बाबुड, रूईछत्रपती आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. सुपा, वाघुंडे, हंगा, मुंगशी, म्हसणे सुलतान, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, शहाजापूर, पळवे, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी आदी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर रूईछत्रपती, भोयरे गांगर्डा, कडूस, बाबुड याठिकाणी सुमारे एक तास पावसाने हजेरी लावली. यादरम्यान ओढे, केटीवेअर, नाले व शेतातील ताली तुडुंब भरून वाहू लागल्या. आज झालेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार असून वापसा होताच शेतकरी खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरूवात करणार आहेत.

हे सुद्धा वाचा :  36 तासांच्या थरारक तपासानंतर अपहृत मुलगी ताब्यात, चंदुकाका सराफ मधून मिनी गंठण चोरीला, तरुणावर हल्ला, कुठे काय घडलं

कोमेजणाऱ्या पिकांना जीवदान
पेरणी पूर्व मशागत झाल्यानंतर जून महिन्याच्या दि. 14 ते 16 तारखेदरम्यान परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यादरम्यान काही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मूग, बाजरी, मका पिकाची पेरणी केली. मात्र सलग पंधरा दिवस पावसाने दडी मारल्याने व कडक उष्णतेमुळे उगवण झालेले उभे पीक कोमजू लागले. उभ्या पिकात पाळी घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. मात्र रविवारी झालेला पाऊस हा पिकांना जीवदान देणारा ठरला.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ