वॉलमनच्या उद्धट वागणुकीविरोधात तीव्र नाराजी, कारवाईची मागणी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहर व उपनगरांमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक व नागरिकांच्या वतीने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक निखिल वारे, नगरसेवक महेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत बोरुडे, रोहन फडतरे आदीसह नागरिकांनी केली.
उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची गरज वाढलेली असताना, वीज वितरणातील अडचणी, भारनियमन तसेच नियोजनाच्या अभावामुळे शहरात वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी पाणीपुरवठ्याबाबत माहिती घेण्यासाठी संबंधित वॉलमनशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची व उध्दट उत्तरे दिली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
तसेच पाणीपुरवठ्याची नोंद ठेवण्यासाठी आवश्यक असलेली डायरी व्यवस्थित न भरणे, नागरिकांच्या स्वाक्षर्या न घेणे अशा प्रकारच्या बेजबाबदार वर्तणुकीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.या संपूर्ण प्रकारामुळे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याचा फटका प्रभागातील लोकप्रतिनिधींनाही बसत असून त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील विस्कळीत झालेला पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा, वॉलमनच्या बेजबाबदार वर्तणुकीवर कठोर कारवाई करावी तसेच पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख, प्रभाग अधिकारी, हेड वॉलमन व संबंधित कर्मचार्यांची तातडीची बैठक आयोजित करून ठोस निर्णय घ्यावेत, अशी ठाम मागणी नगरसेवकांनी केली आहे.










