सीबीआयने संशयिताला घेतले ताब्यात | कसून चौकशी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
देशभरात संतापाची लाट उसळविणार्या आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाने बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. यामुळे अहिल्यानगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटी आणि गुणांमध्ये फेरफार यामुळे आधीच देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव वाढला होता. अखेर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला असून देशभरातील विविध राज्यांमध्ये तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
याच तपासाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून सीबीआयचे विशेष पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली. या व्यक्तीचा पेपरफुटी रॅकेटशी नेमका काय संबंध आहे, प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या साखळीत त्याची भूमिका होती का, आर्थिक व्यवहार झाले होते का, यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.दरम्यान, या कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सीबीआय कडून चौकशी सुरू असून स्थानिक पोलिसांनी आवश्यक ती मदत केली आहे, अशी माहिती दिली. संबंधित व्यक्तीला पुढील चौकशीसाठी कुठे नेण्यात आले, त्याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत किंवा पुढील कारवाई काय होणार याबाबत माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.या कारवाईमुळे आता नीट पेपरफुटी प्रकरणाचे जाळे महाराष्ट्रातही खोलवर पसरल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे नवीन धागेदोरे समोर येत असून आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शयता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थी आणि पालकांमध्ये या प्रकरणामुळे तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला बेड्या
NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी आज पहाटे मोठी कारवाई केली आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिने अहिल्यानगरमधून अटक केलेल्या धनंजय लोखंडे याला मोठी मदत केल्याचा संशय आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा ही विद्यार्थ्यांना गाठून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती. या कारवाईमुळे पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये अनेक छुप्या व्यक्तींचा सहभाग असल्याचे आता स्पष्ट होत आहे. या कारवाईमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले होते, ज्याच्या आधारे ही धरपकड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना पुरवायची ‘एजंट’कडे
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे ही विद्यार्थ्यांना शोधून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होती. अहिल्यानगरमधून ताब्यात घेण्यात आलेल्या धनंजय लोखंडेला तिने मोठी मदत केल्याचा संशय आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी मनीषाकडून एक मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या दोघांमधील संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसही पोलिसांच्या हाती लागले आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, मनीषाला आज सायंकाळपर्यंत सीबीआयच्या ताब्यात दिले जाणार आहे.
कोण आहे धनंजय लोखंडे?
NEET पेपरफुटी प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहे. नाशिकमधून शुभम खैरनार याला ताब्यात घेतल्यानंतर तपासात धनंजय लोखंडेचे नाव समोर आले होते. २६ वर्षीय धनंजय निवृत्ती लोखंडे हा मूळचा राहुरी तालुक्यातील माहेगाव (महाडूक सेंटर) येथील रहिवासी आहे. त्याचे वडील शाळेत लिपिक असून मोठा भाऊ डॉक्टर आहे.
पुण्यातून रॅकेटची सूत्रे?
धनंजयने दोन वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील मंगळुरू येथून बी.ए.एम.एस.चे शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या चार वर्षांपासून तो पुणे जिल्ह्यातील वाघोली परिसरात वास्तव्यास होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तिथेच प्रॅक्टिस सुरू केली होती. वैद्यकीय व्यवसायासोबतच तो मेडिकल ॲडमिशनसाठी ‘कन्सल्टिंग’चे कामही करत असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या शुभम खैरनारच्या जबाबानंतर फरार झालेल्या धनंजयला सीबीआयने राहुरी येथून रात्री उशिरा ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रातील पेपरफुटीचे जाळे नेमके किती मोठे आहे आणि यात आणखी किती डॉक्टर्स किंवा एजंट सहभागी आहेत, याचा शोध आता सीबीआय घेत आहे.










