मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा भूंकप होण्याचे संकेत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे शिवसेनेतील अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
या दाव्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी राऊतांच्या दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 30 आमदार पुढच्या काही महिन्यात भाजपमध्ये विलिन होतील, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. यावर हसन मुश्रीफांनी एकाच वाक्यात प्रतिक्रिया देत तशी शक्यता नसल्याचे वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार अजित दादांचा पक्ष सोडून जाणार नाही, असे हसन मुश्रीफांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावर त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत तेच बरेचशे चालले आहेत अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घटना बदलावरुन संघर्षाचे वारे वाहू लागले असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यात पक्षातील कोणताही ज्येष्ठ नेता नाही. त्या भाजप नेते केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रात कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावांचा केवळ उल्लेख करण्यात आला असून, त्यांच्या नावांपुढे पद नमूद करण्यात आलेले नाही. त्यामुळे पटेल, तटकरे यांच्यावर सुनेत्रा पवार नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यावर बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, “आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंध आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष पुढील काळात अतिशय चांगली प्रगती करेल. काही मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसवून सोडवू.”
भविष्यामध्ये या (राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षातील 25-30 आमदारांसह हा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे मी आताच तुम्हाला सांगत नाही. त्याचबरोबर शिंदे गटातील तितकेच आमदार, म्हणजे 25 -25 आमदार हे भाजपमध्ये जाणार असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.










