भागीदारीचा हिस्सा मागितल्याने व्यावसायिकास दांडक्याने मारहाण, मुकुंदनगरमध्ये अवैध कत्तलखान्यावर छापा
एमआयडीसी परिसरातील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भागीदारीचा हिस्सा मागण्यासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाला आणि त्यांच्या मुलांना लाकडी दांडयाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
निघोज (ता. राहता) येथील रहिवासी रामादास किसन गडकर हे फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतात. अहिल्यानगर एमआयडीसी येथील श्रेया इंडस्ट्रीज कंपनीमध्ये त्यांचा भागीदारीचा हिस्सा आहे. दि. २२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गडकर हे त्यांचे पुत्र शुभम आणि निलेश यांच्यासह कंपनीत हिस्सा मागण्यासाठी गेले होते.
यावेळी तेथे उपस्थित असलेले संदीप बापू गाडेकर, बापू नारायण गाडेकर, सुनंदा बापू गाडेकर आणि सूरज प्रदीप गाडेकर (सर्व रा. खारे कर्जुने, ता. अहिल्यानगर) यांनी त्यांना अडवले. भागीदारीच्या वादातून आरोपींनी गडकर आणि त्यांच्या मुलांना शिवीगाळ करत लाकडी दांडयाने मारहाण केली. तुम्ही जर पुन्हा कंपनीच्या भागीदारीबद्दल विचारले तर तुम्हाला शहरात येऊ देणार नाही आणि आलात तर तुमचे हातपाय तोडून जिवंत मारून टाकू, अशी धमकीही यावेळी देण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादींनी उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पितळे हे करत आहेत.
दारूच्या नशेत तरुणाचा राडा
महिलेचा विनयभंग करून दिली जीवे मारण्याची धमकी
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील सारसनगर परिसरातील संत भगवानबाबा नगर येथे दारूच्या नशेत एका तरुणाने भररस्त्यात गोंधळ घालत एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरोपी नागेश अशोक बडे हा दारूच्या नशेत परिसरात शिवीगाळ करत होता. यावेळी पीडित महिलेने त्यास शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारला. याचा राग मनात धरून आरोपीने महिलेशी अत्यंत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. इतयावरच न थांबता आरोपीने उपस्थित साक्षीदारांना देखील अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कॅम्प पोलिसांनी नागेश बडे याच्यावर विनयभंग, मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पालवे हे पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. अद्याप आरोपीला अटक झालेली नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सारसनगर परिसरात खळबळ उडाली आहे.
मुकुंदनगरमध्ये अवैध कत्तलखान्यावर छापा
१२० किलो गोमांस जप्त, चार जनावरांची सुटका
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
शहरातील मुकुंदनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत १२० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून ४ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.
दिनांक २४ एप्रिल रोजी पहाटे पथक मुकुंदनगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मेहराज मशीद-दर्गा परिसरात काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला असता, काही इसम पळून गेले तर एकाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव जाकिर शब्बिर कुरेशी (वय ५८, रा. सुबेदार गल्ली, झेंडीगेट) असे असून त्याच्या दोन साथीदारांची नावे शेर रऊप कुरेशी आणि नादिर अजिज कुरेशी अशी आहेत. दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २४ हजार रुपये किमतीचे १२० किलो गोमांस, ६० हजार रुपये किमतीची ४ गोवंशीय जनावरे, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे (सत्तूर व सुरा) असा एकूण ८४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी अहिल्यानगर कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार विष्णू भागवत, बाळासाहेब नागरगोजे, सोमनाथ झांबरे, रोहित येमुल, बाळासाहेब खेडकर, उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने केली.
तरुणावर नेप्ती नाका येथे जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर ः शहर परिसरातील नेप्ती नाका येथे जुन्या वादातून एका तरुणावर धारदार शस्त्र आणि हॉकीस्टिकने भीषण हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोरांनी त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची साखळी देखील चोरून नेली आहे.पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.महेश अशोक चव्हाण हे रात्री दीड वाजेच्या सुमारास मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना ही घटना घडली.
शेळके हॉटेलसमोरील पिंपळाच्या झाडाखाली दबा धरून बसलेल्या स्वप्नील उर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे याने त्यांना अडवले. ’मी नालेगावचा दादा आहे’ असे म्हणत त्याने शिवीगाळ सुरू केली. त्याचवेळी तेथे आलेल्या राजेंद्र उर्फ राज्या पांडुरंग कोंडके याने चव्हाण यांच्या हातावर चाकूने वार केला.स्वप्नीलने चव्हाण यांना घट्ट पकडून ठेवले, तर राजेंद्रने हॉकीस्टिकच्या भरीव दांडयाने त्यांच्या हातापायावर दहा मिनिटे सलग प्रहार केले. मारहाणीत चव्हाण जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर दगडानेही हल्ला केला. तुला आज जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत आरोपींनी ्रपरिसरात दहशत निर्माण केली.
प्रवाशाला लुटले
चाकू-कोयत्याने वार करून तीन हजार हिसकावले
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
पुणे येथे कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहणार्या एका तरुणाला दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवर जबरदस्तीने बसवून निर्जन स्थळी नेले. तेथे चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जवळील रोख रकमेसह बॅग लुटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गणेश विज टोकसे (वय ३५, रा. सौंदाणे, नाशिक) हे पुण्यातील बावधन येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. दि. २२ एप्रिल रोजी ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आले होते. रात्री ११ वाजेच्या सुमारास पुणे बसस्थानक (स्वास्तिक चौक) येथे ते बसची वाट पाहत उभे असताना, पांढर्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी गणेश यांना खोली पाहिजे का? अशी विचारणा केली. गणेश यांनी नकार दिला असता, दोन्ही आरोपींनी त्यांना बळजबरीने दुचाकीवर बसवून आनंदऋषी रुग्णालयाकडे जाणार्या अंधार्या गल्लीत नेले. त्या ठिकाणी आरोपींनी गाडीतील चाकू आणि कोयता काढून गणेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केली. गणेश यांनी प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्या पाठीवर, हातावर आणि पायावर कोयत्याने सपासप वार केले. या झटापटीत आरोपींनी गणेश यांच्याकडील तीन हजार रुपये रोख आणि कपड्यांची बॅग हिसकावून घेतली. गणेश यांनी आरडाओरडा केल्याने पकडले जाण्याच्या भीतीने आरोपी दुचाकीवरून पसार झाले. जखमी गणेश यांनी तत्काळ नातेवाईकांशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.










