नेवासा न्यायालयाचा निकाल;
नेवासा | नगर सह्याद्री
महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस नेवासा न्यायालयाने दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली.
28 वर्षीय पीडित महिला व आरोपी बाबासाहेब किसन क्षीसागर (वय 45, सध्या रा, धामणगाव, ता.जामखेड) हे जागरण-गोंधळाचे कार्यक्रम करत असल्याने एकमेकांच्या परिचयाचे होते. दि. 24 जून 2024 रोजी पीडित महिला तिच्या माहेरी असताना आरोपीने गोंधळाचा कार्यक्रम असल्याचे खोटे कारण सांगून तिला फत्तेपूर येथील बसस्थानकावर बोलावून घेतले.
त्यानंतर फिरण्याच्या बहाण्याने तिला घोडेगाव रस्त्याकडे नेले. सकाळी साडेआठच्या सुमारास रस्त्यालगतच्या कठड्यावर बसल्यानंतर आरोपीने महिलेच्या खांद्यावर हात ठेवून विनयभंगाचा प्रयत्न केला. महिलेने विरोध केल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
या प्रकारास पीडितेने प्रतिकार केल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तिच्या मानेवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. घटनेबाबत कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या मदतीने जखमी महिलेला उपचारासाठी अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या जबाबावरून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.्रतत्कालीन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर यांनी तपासाची सूत्रे हाती घेत आरोपीला तातडीने अटक केली. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र नेवासा येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित महिला, वैद्यकीय अधिकारी आणि तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा सखोल विचार करून अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश आर, आर. हस्तेकर यांनी आरोपी बाबासाहेब क्षीरसागर याला भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अंतर्गत दोषी ठरवित पाच वर्षे सश्रम कारावास तसेच शंभर रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. विष्णुदास भोर्डे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना महिला पोलीस कर्मचारी स्वाती तडुलकर यांनी सहकार्य केले.










