- जाहिरात -spot_img
breaking news

क्रिकेटच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; फोटो काढल्याचा संशय, तरुणांवर हल्ला, हुंड्यासाठी छळ…

बॅट आणि स्टम्पने केली बेदम मारहाण
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका तरुणावर जीवघेणा हल्ला होण्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, विद्या विहार कॉलनी येथे राहणारा पंधरा वर्षीय महाविद्यालयीन तरुण यथार्थ कल्पेश परदेशी हा आपल्या मित्रासोबत न्यू आर्ट्स कॉलेजच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. भवानी टायगर्स आणि हरिहरेश्वर किंग्स या दोन संघांमध्ये सामना सुरू असताना एका चेंडूवरून खेळाडूंमध्ये जोरदार वाद झाला. सामना संपल्यानंतर वाद मिटवण्याच्या बहाण्याने आरोपींनी यथार्थला कॉलेजच्या मुख्य गेटवर बोलावून घेतले.

​तेथे दबा धरून बसलेल्या कुणाल घेगडे याने यथार्थच्या जबड्यावर क्रिकेटच्या बॅटने जोरदार प्रहार केला. त्यानंतर सोहम बिंगी याने स्टम्पने त्याच्या हातावर आणि खांद्यावर गंभीर मारहाण केली, तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या ओम घेगडे आणि हर्ष देवळालीकर यांनी यथार्थला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहून मित्र मदतीला धावून आले असता सर्व आरोपी दुचाकीवरून पळून गेले.

​जखमी यथार्थला तातडीने साईदीप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुणाल घेगडे, ओम घेगडे, सोहम बिंगी आणि हर्ष देवळालीकर यांच्याविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल लोणारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंटला या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

फोटो काढल्याच्या संशयावरून तरुणांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला; तीन अनोळखी आरोपींवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील ऐतिहासिक फरियाबाग परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर तीन अनोळखी व्यक्तींनी लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी रेहान असिफ खान (वय १७, रा. कामाठीपुरा, झेंडीगेट) हा आपल्या मित्रांसह फरियाबाग येथे गेला होता. त्या ठिकाणी तीन अनोळखी तरुण दारू पीत बसले होते. आपण दारू पीत असताना रेहान आणि त्याचे मित्र आपले फोटो काढत आहेत, असा गैरसमज या तीन अनोळखी आरोपींनी करून घेतला.

हे सुद्धा वाचा :  डॉक्टरला ११ लाखांना गंडा, दारूसाठी पैसे न दिल्याने दाम्पत्याला धमकी, दुचाकी चोरणार्‍या टोळीचा सुळसुळाट...

​याच कारणावरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी रेहान आणि त्याच्या मित्रांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा वाद एवढ्या विकोपाला गेला की, आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने उमर खान या तरुणाच्या डोक्यावर आणि फैजअली तांबोळी याच्या डाव्या हाताच्या पंजावर लोखंडी कोयत्याने गंभीर वार केले. या हल्ल्यात दोघेही तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​या घटनेनंतर रेहान खान याने कॅम्प पोलीस स्टेशन, भिंगार येथे आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी तीन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. परिसरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पावभाजी चालकावर लोखंडी तव्याने हल्ला; चार जणांवर गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: शहरातील नगर-रेल्वे स्टेशन रस्त्यावरील उज्ज्वल कॉम्प्लेक्ससमोर एका पावभाजी चालकाला आणि त्याच्या भावाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पावभाजीचे पार्सल न दिल्याच्या कारणावरून हा वाद झाला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, समर्थ नगर येथील रहिवासी अलीम जाफर शेख यांचे बुरुडगाव रोडवर पावभाजीचे दुकान आहे. रविवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास उज्ज्वल कॉम्प्लेक्समधील नीलिमा एंटरप्रायजेस येथे काम करणारा एक ओळखीचा व्यक्ती त्याच्या तीन ते चार अनोळखी साथीदारांसह अलीम यांच्या हातगाडीवर आला. त्यांनी अलीम यांच्याकडे पावभाजीचे पार्सल मागितले. काही कारणास्तव पार्सल न मिळाल्यामुळे या सर्वांना प्रचंड राग आला.

​त्यावरून संशयित आरोपींनी अलीम शेख आणि त्यांचा भाऊ अनिस यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने या सर्वांनी दोन्ही भावांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, त्या टोळक्यातील एका आरोपीने थेट हातगाडीवरील पाव गरम करण्याचा लोखंडी तवा उचलला आणि तो अनिस यांच्या डोक्यात जोरात मारला. या हल्ल्यात अनिस गंभीर जखमी झाले आहेत.
​घटनेनंतर अलीम शेख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा :  पारनेरमधील ११ गावांचा विजेचा प्रश्न कायमचा सुटणार; कसे ते वाचा सविस्तर...

हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; सासरच्या पाच जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
​ अहिल्यानगर: घर खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका २९ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे आणि नणंदेसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा आणि नियमांनुसार पीडित महिला व तिच्या माहेरच्या लोकांची नावे सुरक्षिततेसाठी गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

​पीडित महिलेचा विवाह २०१५ मध्ये आष्टी तालुक्यातील पिपळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला होता. विवाहानंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर सासरच्या लोकांनी विवाहितेला त्रास देण्यास सुरुवात केली. घरात काम नीट येत नाही आणि स्वयंपाक व्यवस्थित करत नाही, असे म्हणून तिला टोमणे मारण्यात येत होते. तसेच २०१६ मध्ये पहिली मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने तिला लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण करून घराबाहेर काढले होते.
​त्यानंतर कौटुंबिक न्यायालयात धाव घेतल्यानंतर पतीने पुन्हा नांदवण्याचे आश्वासन दिले आणि तो तिला मुंबई येथे घेऊन गेला. मात्र, तेथेही काही दिवसांनंतर घर घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. विवाहितेने गरिबीमुळे नकार दिला असता, तिला उपाशी ठेवून आणि घरात कोंडून ठेवून अमानुष छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हॉटेलमध्ये तरुणीवर अत्याचार; आरोपी वसीम शेखविरुद्ध गुन्हा दाखल
​अहिल्यानगर: एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर हायवे रोडवरील एका हॉटेलमध्ये २० वर्षीय तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वसीम गफुर शेख (रा. पाईपलाईन हाडको, आंबेडकर चौक, सावेडी, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एकाच कॉलनीत राहणारे आहेत. आरोपी वसीम याने रविवारी, १४ जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तरुणीला संभाजीनगर हायवेवरील हॉटेल चंद्रकांत येथील एका खोलीत नेले. तेथे तिची बदनामी करण्याची आणि तिला जिवे मारण्याची धमकी देऊन, तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तरुणीला आणि तिच्या घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी आणि प्रभारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ