मुंबई / नगर सह्याद्री :
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने चित्रपटसृष्टीतील 35 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या निमित्ताने तिने तिच्या फिल्मी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांबद्दल आणि त्यानंतर झालेल्या यशस्वी पुनरागमनाबद्दलच्या आठवणी सांगितल्या.
एका मुलाखतीत बोलताना रवीनाने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीला तिचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत असल्याने तिला ‘पनौती’ असे संबोधले जात होते. 1991 मध्ये ‘पत्थर का फूल’ या चित्रपटातून तिने बॅालिवूडमध्ये पदार्पण केले. पण तिला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला.
त्या काळातील अनुभव सांगताना ती म्हणाली, “माध्यमं खूप कठोर होती. माझ्या चित्रपटांच्या अपयशानंतर मला ‘पनौती’ म्हणत होते. मात्र, एखादा चित्रपट फ्लॉप होण्यासाठी एकट्या कलाकाराला जबाबदार धरता येत नाही. अभिनेता म्हणून आपण आपलं सर्वोत्तम देत असतो.” असे तिने स्पष्टपणे सांगितले.

रवीनाच्या फिल्मी करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो 1994 मधील सुपरहिट मोहरा चित्रपट. या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर रवीनाला मोठं स्टारडम मिळालं. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. तिच्याबद्दलची इंडस्ट्रीची धारणा पूर्णपणे बदलली. निर्माते गुलशन राय यांनी तिला ‘इंडस्ट्रीची लकी मस्कॉट’ असे संबोधल्याचेही तिने सांगितले.
शूलने दिली वेगळी ओळख
रवीना हसत पुढे बोलताना म्हणाली, “एका चित्रपटानंतर अचानक मी सर्वांसाठी लकी चार्म बनले. अनेक निर्माते फक्त त्यांच्या चित्रपटासाठी माझा छोटासा शॉट मिळावा म्हणूनही संपर्क साधायचे.” तिने पुढे सांगितले की, शूल या चित्रपटानंतर तिच्या अभिनय क्षमतेकडे लोकांनी नव्या दृष्टीने पाहायला सुरुवात केली. ग्लॅमरस भूमिकांपलीकडे जाऊन गंभीर आणि दमदार अभिनयही आपण करू शकतो, याचा विश्वास या चित्रपटाने प्रेक्षक आणि निर्मात्यांना दिला.

वडिलांनी दिलेल्या कानमंत्राची देखील आठवण रवीनाने बोलताना काढली. ती म्हणाली, “पडल्यानंतर पुन्हा उभं राहणं महत्त्वाचं असतं. अपयश आलं तरी थांबायचं नाही, हे बाबांनी शिकवलं.” तिचे वडील रवी टंडन हे चित्रपट निर्माते होते.
90 च्या दशकात गाजलेले चित्रपट
‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘खिलाडियों का खिलाडी’, ‘झिद्दी’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने रवीनाने मोठी लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ‘शूल’ आणि ‘दमन’सारख्या चित्रपटांमधून स्वतःला एक सक्षम अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. ‘दमन’साठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.










