श्रीगोंदा | नगर सह्याद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेमसंबंधातून झालेल्या वादानंतर तरुणाने मुलीची हत्या करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी अल्पवयीन आहे. तिची ओळख काही दिवसापूर्वी शुभम सुखदेव ओव्हाळ याच्याशी सोशल मीडियावर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून तरुणी ही शुभमसोबत श्रीगोंद्यात राहत होती.
यापूर्वीही शुभम व त्याच्या कुटुंबीयांकडून तरुणीला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याबाबत तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जाण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतरही दोघे एकत्र राहत होते. दरम्यान, १५ जून रोजी दुपारी शुभम आणि तरुणी यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. या वादातून शुभमने लोखंडी रॉड व फर्शीने तरुणीच्या डोयावर वार करून तिची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवण्यात आला. शुभमने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली.
त्यानंतर १६ आणि १७ जूनच्या दरम्यान मृतदेह गादीत गुंडाळून मोटारसायकलवरून वडाळी रोड परिसरातील जंगलात नेण्यात आला. तेथे लाकडे गोळा करून पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मृत मुलीच्या आईने शुभम सुखदेव ओव्हाळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ, आई रेखा ओव्हाळ तसेच इतर साथीदारांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.










