नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या 34 दिवसांपासून नीट पेपर फुटीवरुन जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. आंदोलन सुरु असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाची घोषणा केली आहे. मात्र, मोदींच्या या घोषणेवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पेपरफुटीप्रकरणाला त्यांनी थेट मोदींना जबाबदार धरले आहे. “तुम्हीच आमच्या तरुणांच्या भविष्याचे सर्वाधिक नुकसान केले आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले?
राहुल गांधी म्हणाले की, “तुम्ही आमच्या शिक्षण व्यवस्थेवर पूर्ण ताबा मिळवण्यास आणि तिचा विध्वंस करण्यास केवळ परवानगीच दिली नाही तर प्रोत्साहनही दिले. त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला संरक्षण दिले.”राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार करत तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. “१. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा. २. विद्यार्थ्यांची माफी मागा. ३. ज्यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करा.”
तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर भाष्य केले आहे. “देशातील तरुणांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे. तसेच, “सर्व पेपरफुटी प्रकरणांच्या सुनावणीला गती देण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा होईल. आवश्यक कारवाई सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना जारी करण्यात आल्या आहेत.” असे आश्वासन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिले आहे. तसेच, “विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकारकडून घेण्यात येत असलेल्या निर्णयांच्या मालिकेतील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. जो कोणी तरुणांच्या भविष्याशी खेळेल, त्याला सोडले जाणार नाही.” असेही ते पुढे म्हणाले.
आता पेपर फोडणाऱ्यांचं काही खरं नाही, पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी
नीट परीक्षेचा पेपर फुटला होता, या घटनेमुळे सध्या देशभरात वातावरण ढवळून निघालं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या महिन्याभरापासून दिल्लीमधील जंतर मंतरवर कॉकरोज जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. अखरे पेपरफुटी दुरुस्ती विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली आहे. पेपरफुटी दुरुस्ती विधेयकानुसार आता अशा प्रकरणामध्ये तब्बल दहा वर्षांची शिक्षा तसेच दहा कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची मिटिंग पार पडली. यावेळी पेपर लिक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. या विधेयकात पेपर लीक माफियांना कठोर शिक्षा सुनावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेपर लीक प्रकरणाचा खटला स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार असून लीगल बॅकिंग देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तसेच फास्ट ट्रॅक कोर्टात तीन महिन्यांत सुनावणी करून निर्णय देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. तर, पेपर लीक प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा आणि 10 कोटीच्या आर्थिक दंडाची तरतूदही करण्यात आली आहे. पेपर लीक दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार आहे. तसेच सोमवारी हे विधेयक सभागृहात मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
27 जुलै रोजी विधेयक येणार
सरकारच्या म्हणण्यानुसार, कायदा बनवून कोर्ट स्थापन करण्यात येणार आहे. पेपर लीक प्रकरणाची सुनावणी जास्तीत जास्त तीन महिन्यात करण्यात येणार आहे. येत्या 27 जुलै रोजी सभागृहात हे विधेयक मांडलं जाणार आहे. शुक्रवारी दोन्ही सभागृहात नीट पेपरफुटी प्रकरणावरून मोठा गदारोळ झाला. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज रविवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. दरम्यान आता या पेपर लीक दुरुस्ती विधेयकामुळे अशा घटनांना चाप बसण्याची शक्यता आहे. देशभरात सध्या नीट पेपर फुटी प्रकरणावरून वातावरण तापलेलं असतानाच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 27 जुलै रोजी हे विधेयक सभागृहात मांडलं जाणार आहे.
विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का केला? राहुल गांधींचा सवाल
नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, या मोर्चात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून आता राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेला एक तरुण देखील होता, या तरुणावर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हला का करण्यात आला? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.
26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
राजधानी दिल्लीत गेल्या 25 दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू होतं. अखेर 26व्या दिवशी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतलाय.
नीट पेपरफुटीप्रकरणात जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावी, अशी मागणी सोनम वांगचुक यांच्यासह कॉक्रोच जनता पक्षाच्या (CJP) अभिजीत दीपके यांनी केली आहे. तर दुसरीकडे या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीनंतर विद्यार्थ्यांसह सर्व स्थरातून रोष वाढला आहे. परिणामी कॉक्रोच जनता पक्षाच्या या आंदोलनाला आता देशभरातून समर्थन मिळत आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद करण्यासंदर्भात माहिती दिली. तर आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर वांगचुक यांनी आपले उपोषण सोडले. यावर आता पंतप्रधान मोदींनी त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
आज पेपरफुटीवर आणखी कडक कारवाई करणार” ; PM मोदींचा मध्यरात्री उशिरा विद्यार्थ्यांना व्हिडिओ संदेश
दिल्लीत जंतर मंतर याठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान मोदींनी काल रात्री उशिरा एक व्हिडिओ संदेश जारी केला. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पेपर लीकवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान मोदी यांनी मध्यरात्री जारी केलेल्या व्हिडिओमध्ये, “पेपरफुटी हा किरकोळ मुद्दा नाही. या प्रकरणी आज आणखी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मित्रांनो, पेपरफुटी हा किरकोळ मुद्दा नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना प्रचंड वेदना होतात.” त्यांनी सांगितले की, गेल्या अडीच महिन्यांतील पेपरफुटीच्या घटनांनंतर सरकारने अनेक पावले उचलली असून, दोषींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक वर्ष वाया जाऊ नये, ही सरकारची सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे, अंदाजे २२ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा शक्य तितक्या कमी वेळेत घेण्याची व्यवस्था करण्यात आली. पंतप्रधानांनी नमूद केले की, १९ तारखेला परीक्षेचे निकालही जाहीर झाले असून, देशभरातून यशस्वी विद्यार्थ्यांच्या आनंदाच्या बातम्या येत आहेत.
जलदगती न्यायालये आणि कठोर शिक्षेचा प्रस्ताव
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार केवळ या एका कारवाईने समाधानी नाही. त्यांनी स्पष्ट केले की, आज त्यांनी संबंधित विभागांना पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागांनी अथक परिश्रम करून काल रात्री उशिरा एक मसुदा तयार केला आणि तो त्यांना सादर केला. पंतप्रधानांनी सांगितले की, या प्रस्तावात जलदगती न्यायालये आणि दोषींना कठोर शिक्षेची तरतूद आहे. या मसुद्यावर शुक्रवारी मंत्रिमंडळात चर्चा केली जाईल आणि मंत्र्यांच्या सूचनांनंतर त्याला अंतिम रूप दिले जाईल. त्यांनी सांगितले की, संसदेचा दुसरा आठवडा सोमवारपासून सुरू होत असून, सरकार हे विधेयक सभागृहात लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करेल.
दरम्यान, केंद्र सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या सचिव पदावर मोठा बदल केला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी विनीत जोशी यांना उच्च शिक्षण विभागाच्या सचिव पदावरून हटवून पंचायत राज मंत्रालयात सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नरेश पाल गंगवार यांची उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
‘हे प्रकरण असंच सोडणार नाही!’ नीट पेपरफुटीवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक इशारा ; केंद्राला दिले मोठे आदेश
पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतर हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाने आज पेपर लीक प्रकरणावर सुनावणी करताना सांगितले की, हे प्रकरण असे जाऊ दिले जाऊ शकत नाही” असे म्हणत सरकारला मोठे आदेश दिले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, आम्ही अनेक पावले उचलणार आहोत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही खूप गंभीर आहोत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, ‘आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी खूप गंभीर आहोत. राधाकृष्णन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी होईल, मात्र सरकार यापेक्षा अधिक पावले उचलणार आहे. अनेक गोष्टी होणार आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार यांनीही न्यायालयाकडे एका आठवड्याचा अवधी मागितला. आम्ही न्यायालयाला सविस्तर माहिती देऊ, असे ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सुनावणी करताना म्हटले, ‘ठीक आहे. संपूर्ण यंत्रणा सुरळीत असावी, अशी आमची इच्छा आहे. तुम्ही तुमचे उत्तर दाखल करा. सोमवार, ३ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सांगितले की, ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या पुढील वर्षीपासून NEET-UG परीक्षेसाठी संगणक-आधारित परीक्षा आयोजित करण्याच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सायबर सुरक्षा आणि डेटा सुरक्षिततेवर ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे.’ NEET पेपर लीक प्रकरणाबाबत काय पावले उचलली जातात यावर आम्ही लक्ष ठेवू, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह सरन्यायाधीशांना भेटणार
दरम्यान, पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर मंतरवर गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलने सुरू आहेत. ‘झुरळ जनता पार्टी’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. विरोधी पक्षही त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह पुन्हा एकदा सरन्यायाधीशांना भेटणार आहेत. ते दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये भेटतील.










