खासदार लंके यांचे संकेत | जागा वाटपापूर्वीच खासदारांनी जाहीर केला उमेदवार; शिवसेना ठाकरे गटाची मोठी कोंडी, पदाधिकारी नाराज
गणेश जगदाळे | नगर सह्याद्री
महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी अत्यंत सक्रिय असल्याचे चित्र असले, तरी पारनेर तालुक्यात मात्र या आघाडीच्या अस्तित्वावरच आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कान्हूरपठार येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमात खासदार नीलेश लंके यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. पारनेरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण उमेदवारी जाहीर करत असताना खासदार लंके यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उबाठा) या पक्षांना विचारात घेतले नाही.
कान्हूर पठार येथील कार्यक्रमात खासदार लंके यांनी पारनेर तालुक्यातील नवनिर्मित जवळा जिल्हा परिषद गटातून ज्येष्ठ नेते आणि बाजार समितीचे संचालक मारुती रेपाळे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. निलेश लंके यांनी भर सभेतच मारुती रेपाळे यांच्या नावाचा जाहीर उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पाट (शरदचंद्र पवार) पक्षाकडून त्यांची उमेदवारी आता निश्चित मानली जात आहे. मात्र, लंकेंच्या या एकतर्फी घोषणेमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि पक्षांतर्गत नाराजी चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे, या जवळा जिल्हा परिषद गटातून खासदार लंके यांचे बंधू दीपक लंके तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते जितेश सरडे व बाजार समितीचे माजी सभापती किसनराव रासकर इच्छुक होते.
मात्र, खासदारांनी ज्येष्ठ नेते मारुती रेपाळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यामुळे पक्षांतर्गत इच्छुकांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या अंतर्गत नाराजीपेक्षाही मोठा धक्का महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला बसला आहे.शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे हे गेल्या अनेक दिवसांपासून जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी करत आहेत. त्यांनी या भागात आणि संपूर्ण पठार भागावर मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे. विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट नाळ जोडत या गटात आपली मोर्चेबांधणी भक्कम केली होती.
परंतु, महाविकास आघाडीत जागावाटपाची कोणतीही चर्चा होण्यापूवच खासदार लंके यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार जाहीर करून टाकल्यामुळे डॉ. श्रीकांत पठारे यांची मोठी राजकीय कोंडी झाली आहे.खासदारांच्या या पवित्र्यामुळे पारनेर तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणारच नाही, असे स्पष्ट चित्र आता निर्माण झाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुक्यातील मुख्य नेते म्हणून डॉ. श्रीकांत पठारे काम पाहत असताना, त्यांनाच डावलून जर उमेदवार जाहीर होत असेल, तर खासदार लंके आगामी निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत कशा पद्धतीने घेणार, हा आता मोठा प्रश्न बनला आहे. भरसभेत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते अत्यंत नाराज झाले असून, त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे.जवळा जिल्हा परिषद गटाचे महत्त्व आणखी वाढण्याचे कारण म्हणजे, पारनेर तालुक्यातील एकूण पाच जिल्हा परिषद गटांपैकी केवळ जवळा हा एकच गट खुला पुरुष प्रवर्गसाठी आरक्षित आहे. त्यामुळे या गटात सर्वच राजकीय पक्षांमधून इच्छुक उमेदवारांची संख्या खूप मोठी आहे.
अशा अटीतटीच्या गटात खासदार लंके यांनी घाईघाईने आपला उमेदवार जाहीर केल्यामुळे आता विरोधकांसाठी देखील आपली रणनीती आखणे आणि निवडणुकीची तयारी करणे अधिक सोपे झाले आहे.खासदार लंकेंच्या या अनपेक्षित खेळीनंतर आता महाविकास आघाडीतील तणाव कमालीचा वाढला आहे. यापुढील काळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे नेमकी काय राजकीय भूमिका घेतात, बंडखोरीचे अस्त्र उपसतात की आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे या एकतर्फी उमेदवारीबाबत तक्रार करतात, याकडे आता संपूर्ण पारनेर तालुक्याचे डोळे लागले आहेत. लंकेंच्या या विधानामुळे पारनेरमधील महाविकास आघाडीत पडलेली फूट आता कशी सांधली जाते की येथील आघाडी पूर्णपणे विस्कळीत होते, हे येणारा काळच ठरवेल.
विधानसभेला मदत न केल्याची खासदार लंके यांची धारणा!
विधानसभा निवडणुकीमध्ये राणी लंके यांचा पराभव झाला. या निवडणुकीमध्ये पारनेर तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षाकडून महाविकास आघाडी असूनही मदत न झाल्याची खासदार लंके यांची धारणा आहे. त्यामुळे लंके हे नाराज असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये ते शिवसेने सोबत आघाडी करू इच्छित नाही, हे मारुती रेपाळे यांची उमेदवारी जाहीर करून लंके यांनी अधोरेखित केले आहे.
रेपाळे यांच्या उमेदवारीवरून पारनेरमध्ये आघाडीत वाद
रेपाळे यांची उमेदवारी जाहीर करताना खासदार लंके यांनी काँग्रेस व शिवसेना (उबाठा) या महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेतल्यामुळे स्थानिक काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते व पाडळी दर्या सरपंच रामदास खोसे यांनी खा. लंके यांच्यावर टीका करताना म्हटले की, फक्त खासदार होण्यासाठीच लंके यांना महाविकास आघाडी आठवली होती का? आघाडीचा धर्म पाळताना शिवसेनेने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत लंके यांना मदत केली परंतु त्यांना त्याचा आता विसर पडला आहे. पारनेर तालुक्यात महाविकास आघाडी तुटली, असे खासदार लंके यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर करावे, असे आवाहन सरपंच खोसे यांनी दिले आहे.










