मुंबई / नगर सह्याद्री :
देशभरात NEET पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित त्रुटींविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून अनेक सेलिब्रिटींनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, काही कलाकारांनी या मुद्द्यावर मौन बाळगल्याने त्यांच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.
कपूर कुटुंबातील सून आलिया भट्टने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आता अभिनेत्री करिना कपूर खान हिनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याचे सांगत तिने शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेची गरज अधोरेखित केली.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये करीना म्हणाली, “मी गेल्या काही दिवसांपासून या विषयावर विचार करत होते. पण आता अधिक काळ शांत राहणं शक्य नाही. इतक्या मोठ्या संख्येने स्वतःचा आवाज उठवणाऱ्या तरुणांकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात शिक्षणाचं अनन्यसाधारण महत्त्व असतं. शिक्षण त्यांना आत्मविश्वास, आशा आणि उज्ज्वल भविष्याची दिशा देतं.”

तिने पुढे म्हटले की, “विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास टिकून राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि गुणवत्तेला महत्त्व मिळत नसल्याची भावना निर्माण झाली, तर संपूर्ण व्यवस्थेवरील त्यांचा विश्वास डळमळीत होतो. कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या मेहनतीचं फळ मिळेल की नाही, असा प्रश्न पडता कामा नये.”
करिनाने विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उभी करण्याची गरज व्यक्त करत, “कर्तृत्वाला योग्य सन्मान, मेहनतीला न्याय आणि प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळणारी यंत्रणा ही कोणतीही अतिरिक्त मागणी नसून, शिक्षण व्यवस्थेची मूलभूत गरज आहे,” असेही नमूद केले.

पोस्टच्या शेवटी तिने विद्यार्थ्यांच्या आवाजाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले आहे ती म्हणाली, “जेव्हा संपूर्ण पिढी स्वतःच्या भविष्याविषयी एकत्र येऊन बोलते, तेव्हा त्यांचे म्हणणे ऐकून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आज आपण घेतलेली भूमिका उद्याच्या पिढीचा व्यवस्थेवरील विश्वास ठरवणार आहे. कारण हीच मुलं आपला उद्याचा भारत घडवणार आहेत.”










