नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
भारतीय हवामान विभागाने (IMD) अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ३ जून ते ७ जून २०२६ या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार मेघगर्जना व वीजा चमकत असताना झाडाखाली, विद्युत खांबाजवळ, टॉवर, धातूचे कुंपण किंवा ट्रान्सफॉर्मर परिसरात थांबू नये. वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. वीजेच्या इशाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे “दामिनी” अप डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडगडाटी वादळादरम्यान विद्युत उपकरणांचा वापर टाळावा. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल व सायकलपासून दूर राहावे. तसेच जाहिरात फलक, लोंबकळणाऱ्या केबल्स आणि धोकादायक संरचनांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
धरण, नदी व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. पाण्यात उतरू नये तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढणे टाळावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकरी बांधवांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाचे पाऊस, वारा किंवा गारपिटीमुळे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जनावरांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर (दूरध्वनी : 0241-2323844 / 2356940), तसेच 112 किंवा 1077 (टोल फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.










