- जाहिरात -spot_img
breaking news

केडगावमध्ये महिलेला लुटले, भिस्तबागजवळ गोळीबार, अवैध दारूविक्रीविरोधात छापेमारी, कुठे काय घडलं

 

पाच गुन्हे दाखल | 41 हजारांहून अधिक किमतीचा मद्यसाठा जप्त; खर्डा पोलिसांची मोठी कारवाई
जामखेड | नगर सह्याद्री
जामखेड शहरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात खर्डा पोलिसांनी धडक कारवाई करत एकाच वेळी पाच ठिकाणी छापे टाकून मोठा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत 41 हजार 470 रुपयांचा देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पाच जणांविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जामखेड शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना गुप्त बातमीदारामार्फत जामखेड शहरातील विविध हॉटेल आणि परिसरात अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत त्यांनी खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उज्वलसिंह राजपूत यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले.

त्यानुसार राजपुत यांनी विशेष पथक तयार करून जामखेड शहरात नियोजनबद्ध छापेमारी मोहीम राबवली. पोलिसांनी खर्डा रोड आणि नगर रोड परिसरातील हॉटेल सागर, हॉटेल तांबे, हॉटेल साई, हॉटेल साहेबा आणि हॉटेल पाटीलवाडा येथे छापे टाकले. छाप्यादरम्यान संबंधित ठिकाणी अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी सागर पांडुरंग नेटके, ज्ञानेश्वर रंजित तांबे, राजेंद्र रामभाऊ देवकाते, सचिन विक्रम तनपुरे आणि उमेश विनोद मुळे यांच्याविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाईत पोलीस अंमलदार शशी म्हस्के, पंडित हंबर्डे, धनराज बिराजदार, अशोक बडे आणि गणेश बडे यांनी सक्रिय सहभाग घेतला. पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.

अवैध धंद्यांविरोधात पोलीस ॲक्टिव्ह
जिल्ह्यात अवैध दारूविक्री, जुगार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांचे विशेष अभियान सुरू असून, अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

केडगावमध्ये वृद्ध महिलेला लुटले; सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास
अहिल्यानगर | नगर सह्याद्री-
केडगाव परिसरातील वैष्णवनगर भागात तुळजाभवानी मंदिरासमोर एका वृद्ध महिलेला जबरदस्तीने लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेचे तोंड दाबून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. या झटापटीत वृद्ध महिलेचा दात पडला असून, या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :  फुले चौकात अरुणकाकांच्या २० फुटी भव्य प्रतिमेचे अनावरण

फिर्यादी हे माथाडी कामगार आहेत. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांची 94 वषय वृद्ध आई लघवीसाठी घराबाहेर आली होती. ती परत घरात जाऊन खाटेवर बसली असताना, दोन अज्ञात चोरट्यांनी घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला. चोरट्यांनी वृद्ध महिलेचे तोंड दाबून धरले आणि तिच्या नाकातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची गोल नथ, गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि 600 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 32 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. तोंड दाबल्यामुळे वृद्ध महिलेचा दात पडला असून ती जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.,

भिस्तबाग नाक्याजवळ हवेत गोळीबार
अहिल्यानगर ः शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग नाक्याजवळ पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्‌‍यादरम्यान आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिरंजीव दत्तात्रय गाढवे (वय 31, रा. गणेशनगर, बोल्हेगाव) हे पाईपलाईन रोडवरील भिस्ते बाग नाक्याजवळ आले असता, तोंडाला मास्क लावलेले तीन ते चार अज्ञात तरुण अचानक त्या ठिकाणी आले. ‌‘तुम्ही पप्पू शेठ आणि गौरव यांच्यावर गुन्हा का दाखल केला?‌’ असा जाब विचारत या अज्ञात आरोपींनी चिरंजीव गाढवे यांच्यावर थेट हल्ला चढवला. एका आरोपीने लोखंडी वस्तूने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जबर मारहाण केली, तर दुसऱ्या आरोपीने धारदार शस्त्राने त्यांच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. पिस्तूल बाहेर काढले. आरोपीच्या हातात पिस्तूल पाहताच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादी चिरंजीव गाढवे यांनी तात्काळ जवळच असलेल्या एका चहाच्या दुकानात धाव घेतली आणि तेथील फ्रीजच्या मागे लपून बसले. संतापलेल्या आरोपींनी दुकानाच्या बाहेरूनच हवेत गोळीबार केला आणि परिसरात दहशत पसरवून सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या थरारक हल्ल्‌‍यानंतर जखमी चिरंजीव यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

हे सुद्धा वाचा :  अवकाळीचा फटका, गारपिटीने पिके सपाट, कुठे किती नुकसान, पहा

शेजाऱ्याकडून विश्वासघात; सोन्याचे दागिणे केले हडप
अहिल्यानगर : लग्नकार्यात घालण्यासाठी शेजाऱ्याकडून विश्वासाने नेलेले लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने परत न करता, त्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार नागापूर परिसरातील पितळे कॉलनी येथे उघडकीस आला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने तिच्या घराशेजारी पूव राहणाऱ्या एका ओळखीच्या महिलेवर विश्वास ठेवला होता. संबंधित आरोपी महिलेने लग्नकार्यात घालण्यासाठी दागिने हवे असल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिने सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची पोत, 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले फुल आणि वेल, तसेच 70 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची ठुसी असे एकूण 4 लाख 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उसने नेले होते. हे दागिने घेतल्यानंतर आरोपी महिलेने ते परत न करता सोन्याचा अपहार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार करत आहेत.

उपोषणाचा राग मनात धरून एकाला मारहाण
अहिल्यानगर: उपोषणाला बसू नको, असे म्हणून चौघांनी एका 56 वषय व्यक्तीला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना पिंपळगाव माळवी शिवारात घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब दशरथ काळे (वय 56, रा. उंबरे, ता. राहुरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सुनील आप्पासाहेब दुर्सिंग, अनिल सुखदेव दुर्सिंग, बबलू राजेंद्र ढोकणे आणि प्रवीण भास्कर शिरसाठ (सर्व रा. उंबरे, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादी भाऊसाहेब काळे हे आपल्या दुचाकीवरून वांबोरी रस्त्याने अहिल्यानगरकडे जात होते. ते पिंपळगाव माळवी गावच्या शिवारात आले असता, आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवले. ‌‘तू उपोषणाला बसू नको‌’ असे म्हणून त्यांनी काळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर काळे यांनी ‌’मी तुमच्याविरुद्ध उपोषणाला बसणारच आहे‌’ असे उत्तर दिले. याचा तीव्र राग मनात धरून सुनील दुर्सिंग याने हातातील एका टनक वस्तूने काळे यांच्या उजव्या गालावर मारून त्यांना जखमी केले. तसेच जर तू उपोषणाला बसला तर तुला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीचा भ्रमणध्वनी हिसकावून जमिनीवर फेकून दिला आणि त्याचे नुकसान केले. या घटनेनंतर काळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पुढील तपास सहाय्यक फौजदार महंमद शेख करत आहेत.

Follow us:
नगर सह्याद्री
नगर सह्याद्री
राकट, कणखर ही सह्याद्रीची ओळख! तीच ओळख जपत ‘कुटुंबाचा सखा, सत्याचा पाठीराखा’ ही भूमिका घेत ऑक्टोबर २०१३ पासून दैनिक नगर सह्याद्री चा प्रवास संपादक शिवाजी शिर्के यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
हे सुद्धा वाचा
spot_img

तुमच्या मते 2026 मध्ये सर्वात मोठा मुद्दा कोणता आहे?

Loading ... Loading ...

महाराष्ट्र बातम्या

ब्रँड स्टोरी

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ