पुढील 45 दिवसांचा पाणीप्रश्न मिटला
शिरूर | नगर सह्याद्री
मान्सूनचे आगमन उशिरा होण्याची शक्यतेच्या पार्श्वभूमीवर घोडनदीवरील हत्तीडोह येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्याने शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता तात्पुरती दूर झाली असून, उपलब्ध जलसाठा पुढील 40 ते 45 दिवस पुरेल, अशी माहिती शिरूर नगरपरिषद प्रशासनाने दिली.
सुमारे 50 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शिरूर शहराचा पाणीपुरवठा हत्तीडोह बंधाऱ्यावर अवलंबून आहे.55 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता असलेला हा बंधारा पूर्ण भरल्याने शहरासाठी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. शहरातील पाणीटंचाई टाळण्यासाठी शिरूर नगरपरिषदेने कुकडी विभागाच्या 61 क्रमांकाच्या वितरिकेतून बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर केला होता. त्यानुसार मागील आठ दिवसांपासून घोडनदी पात्रात पाणी सोडण्यात येत होते. आमदार कटके यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून या विषयाचा पाठपुरावा केला. नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे, पाणीपुरवठा सभापती सुनित पोटे यांनीही समन्वय साधत या प्रयत्नांना गती दिली.बंधारा पूर्ण भरल्यानंतर नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, विविध समिती सभापती, नगरसेवक आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत आढावा घेतला.










